नदीकाठच्या शेतकऱ्यांचे आठव्या दिवशी उपोषण मागे

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सुरु असलेले बेमुदत उपोषण अखेर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. हक्काच्या पाण्यासाठी नीरा खोरे शेतकरी बचाव कृती समिती स्थापना करुन न्यायालयामध्ये दाद मागण्याचा महत्वपूर्ण निर्णय नदीकाठच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सुरु असलेले बेमुदत उपोषण अखेर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. हक्काच्या पाण्यासाठी नीरा खोरे शेतकरी बचाव कृती समिती स्थापना करुन न्यायालयामध्ये दाद मागण्याचा महत्वपूर्ण निर्णय नदीकाठच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारे कोरडे असल्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी २० मार्च रोजी रास्तारोको आंदोलन करुन २२ मार्च पासुन निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ,खोरोची सरपंच संजय चव्हाण,धनंजय रणवरे यांच्यासह १६ शेतकऱ्यांनी  बेमुदत उपोषणला सुरवात केली होती. नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेवून नदी मध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती.

तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनीही स्थगन विषयामध्ये नदीमध्ये पाणी सोडण्याचा प्रश्‍न  उपस्थित केला होता. खासदार सुप्रिया सुळे,  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीच्या बांधकाम व आरोग्य समितीचे प्रवीण माने यांनी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी पाठपुरवा केला होता. मात्र प्रशासनाने वीर व भाटघर धरणामधून नीरा  नदीमध्ये पाणी सोडण्चाी तरतुद नसल्यामुळे  बुधवार (ता. २८) रोजी पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे आज गुरुवारी (ता.२९) उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र हक्काचे पाण्यासाठी लढाई लढायाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून उपोषणामुळे नदीकाठचे शेतकरी एकवटे अाहेत.

पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला दिशा मिळाली आहे. आज शासनाने पाणी सोडण्यास नकार दिला असला तरीही भविष्यात  प्रत्येक उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले. इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील,सभापती अप्पासाहेब जगदाळे, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील,वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन यांच्या हस्ते ज्युस घेवून उपोषण सोडले.यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग, पप्पू पाटील, रामभाऊ रणसिंग, विनोद रणसिंग उपस्थित होते.

ठळक मुद्दे :-

 नीरा खोरे शेतकरी बचाव कृती समितीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण  निर्णय...

कालवा सल्लागार समितीमध्ये नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी घेण्याची मागणी...

उन्हाळ्यामध्ये  नदीतुन १ टीएमसी पाणी सोडण्याची तरतुद करण्याची मागणी...

बंधाऱ्यांची गळती शंभर टक्के बंद करण्याची मागणी...

खडकवासला धरणातील ३.९ टी.एम.सी पाणी नीरा डाव्या कालव्यामध्ये सणसर कटमधून सोडण्याची मागणी...

नीरा उजव्या व डाव्या कालव्याच्या पोटचारीने नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती...

खासदार राजू शेट्टी सोबत लवकरच बैठकीचे आयोजन करुन पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार...

शासन पुणे शहाराला आठ टीएमसी ज्यादा पाण्याचा पुरवठी करीत असून  नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक टी.एम.सी पाणी देत नसल्याबद्दल शासनाचा निषेध...

Web Title: hunger strike finally get over in front of river