पुण्यात आजारी पत्नीचा खून करुन पतीने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पत्नीच्या आजारपणामुळे होणार्‍या यातना सहन न झाल्यामुळे रावेत येथील एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्‍यात हातोडी मारून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. 

पिंपरी : पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने तिच्या डोक्‍यात हातोडी मारून खून केला. त्यानंतर स्वतःही घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रावेत येथे बुधवारी (ता. 28) पहाटे ही घटना घडली. वृषाली गणेश लाटे (वय 40) खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती गणेश ऊर्फ संजय चंद्रकांत लाटे (वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वृषाली यांची बहीण संध्या गुजर (रा. आकुर्डी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

देहूरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाटे टेक महिंद्रा कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरीस होते. वृषाली या गृहिणी होत्या. वृषाली यांनी मंगळवारी दिवसभर काहीही खाल्ले नव्हते. त्यामुळे त्यांना समजाविण्यासाठी त्यांची बहीण संध्या आणि अन्य नातेवाईक रात्री बारापर्यंत लाटे यांच्या घरीच होते. मंगळवारी (ता. 27) वृषाली देवांच्या छायाचित्राकडे बघून सारखी क्षमा मागत होत्या. त्या वेडसर असल्याने त्यांना उपचारासाठी बुधवारी रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरल्यानंतर सर्व नातेवाईक निघून गेले. पहाटे तीन वाजता संजय यांनी आत्महत्येची चिठ्ठी सर्व नातेवाइकांना व्हॉटसऍपवर पाठविली. बुधवारी सकाळी नातेवाईक पोलिसांना घेऊन आले. लाटे दाम्पत्याला मूल नव्हते. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या काहीसे अस्वस्थ होते. 

पोलिसांना या संदर्भात संजय लाटे यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात असे म्हटले आहे की, वृषालीची सध्याची अवस्था पाहवत नाही. त्यामुळे हे पाऊल उचलत आहे. मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. तसेच ती माझ्याशिवाय जगू शकणार नाही. त्यामुळे अत्यंत जड मनाने मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. तसेच सोसायटीतील रहिवाशांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. एकही कार्यक्रम रद्द करू नये. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide by murdering ill wife in Pune