पुण्यात गरोदर पत्नीला नवऱ्याने रस्त्यावर सोडले; सांगा तिने जगायचे कसे?

पांडुरंग सरोदे
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

दोन महिन्यांपासून ती अक्षरश: वेड्यासारखी फिरत आहे. माहेरचे, सासरचे तिला स्वीकारेनात. मंगळवारी फिरत-फिरत ती वाकड पोलिसांकडे गेली.

पुणे : तिने त्याच्यावर नितांत प्रेम केले. कुटुंबाचा विरोध झुगारून त्याच्याशी लग्नही केले, दोघांनी त्यांचा संसार थाटला. त्यांच्या संसारवेलीवर हळूहळू एक फुलही उमलु लागले. पण, अचानक, त्याने अर्ध्यावर डाव मोडला. तो तिला सोडून निघून गेला. तेही ती सात महिन्यांची गरोदर असताना. दोन महिन्यांपासून ती वेड्यासारखी फिरत आहे. माहेरचे, सासरचे तिला स्वीकारेनात. मंगळवारी फिरत-फिरत ती वाकड पोलिसांकडे गेली. संवेदनशील पोलिसांनी तिची अवघडलेली स्थिती पाहून सामाजिक संस्थेला फोन केला आणि ती एका संस्थेत विसावली! 

पाषाण हृदयी माणसांच्याही काळजाला पाझर फोडणारी ही कोणत्याही चित्रपटाची कथा नाही, ही एक घटना आहे. तिही अवघ्या 22 वर्षांच्या तरुणीसोबत घडलेली. नऱ्हे-आंबेगाव येथे राहणाऱ्या कल्पनाचे (नाव बदलले आहे.) एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. पण, तिच्या घरच्यांना ते प्रेम मान्य नव्हते. त्यामुळे कल्पनाने दीड वर्षांपूर्वी घरातून निघून जाऊन, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्याच्याबरोबर लग्न केले. लग्नानंतर सारंकाही ठिक होईल, या भावनेने. त्यानुसार सुरुवातीला काही दिवस त्यांचा संसार चांगला सुरू झाला. त्या दोघांच्या संसासारामध्ये आता एक फुल उमलले होते. होय, तिच्या पोटात एक अंकुर हळूहळू वाढत होता. तिला पाचवा महिना सुरू होता आणि एक दिवस अचानक त्याने तिची साथ सोडली. तो निघून, पळून गेला. ज्याच्यामुळे दुनियेला ठोकर मारून ती इथपर्यंत आली, त्यानेच साथ सोडल्यावर तिच्या डोक्‍यावर अक्षरशः आभाळ कोसळलं. 

सासरच्यांनी तर सोडाच, पण माहेरच्यांनी तिला स्वीकारायला नकार दर्शविला. सात महिन्यांच्या अवघडलेल्या अवस्थेत ती जिकडे रस्ता दिसेल, तिकडे फिरू लागली. अशीच फिरत-फिरत मंगळवारी दुपारी ती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाकड पोलिस ठाण्यात पोचली. संवेदनशील पोलिसांनी तिची अवघडलेली स्थिती पाहून पुण्यातील भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या शहराध्यक्षा कांचन कोळपकर-दोडे यांच्याशी संपर्क साधाला. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत गरोदर मातेची पुण्यातील मोतीबागेजवळील स्नेहालय या संस्थेशी संपर्क साधून तिथे तिची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. 

संबंधित गरोदर महिलेबाबत मला वाकड पोलिसांनी फोन केला. त्यानुसार, महिलेची स्नेहालय या संस्थेत राहण्याची व्यवस्था केली आहे. पण, पालकांनी तिचा स्वीकार केल्यास तिला बळ मिळेल.
- कांचन कोळपकर-दोडे, सामाजिक कार्यकर्त्या  

खरचं तिचे आई-बाबा करतील तिचा स्वीकार?
ज्यांनी जन्म दिला, तळहातावरील फोडाप्रमाणे तिला जपले. त्या तिच्या आई-वडीलांनीही केवळ तिने तिच्या मनाप्रमाणे लग्न केले म्हणून, तिला नाकारले. पण, ती आता सात महिन्यांची गरोदर असतानाही तिचा स्वीकार करण्यास ते तयार नाहीत. तिने प्रेम केला हा गुन्हा होता का? तिच्या पोटात बाळ आहे हा तिचा गुन्हा आहे का? यासारखे अनेक प्रश्‍न आता पुढे येऊ लागलेत, सांगा आता तिने जगायचे तरी कसे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband leaves pregnant wife on a road in pune wakad police