हुतात्मा एक्सप्रेसच्या सततच्या विलंबाने प्रवासी त्रस्त

हुतात्मा एक्सप्रेसच्या सततच्या विलंबाने प्रवासी त्रस्त
Published on

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचा संग्रहित फोटो वापरावा.
---
‘हुतात्मा’च्या सततच्या
विलंबाने प्रवासी त्रस्त
आज ३ तास उशीर; मध्यरात्री सोलापुरात
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : पुणे आणि सोलापूर या दोन शहरांना जोडणारी अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाची मानली जाणारी ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी (ता. १८) देखील या गाडीच्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आला होता. ही गाडी सोलापूरहून तिच्या नियमित वेळेपेक्षा तब्बल ३ तास उशिराने सुटली आणि पुणे येथूनही उशिराच सुटल्याने मध्यरात्री सोलापूरला पोचली.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस (१२१५७) सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून आपल्या नियमित वेळेनुसार सायंकाळी ५.५० वाजता सुटण्याऐवजी रात्री ८.५० वाजता सुटली. आधीच ३ तास उशिराने सुटल्यामुळे ही गाडी सोलापूरला अत्यंत उशिरा पोचली आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
---
उशिराचे सातत्य कायम; वेळापत्रक कोलमडलेलेच
हुतात्मा एक्स्प्रेसचा लेटमार्क केवळ एक-दोन दिवसांचा नसून मागील काही दिवसांपासून सातत्याने वेळापत्रक विस्कळित झाले आहे. दौंड ते मनमाड दरम्यान निंबळक-अकोळनेर परिसरात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाचा या गाडीला फटका बसत आहे. याशिवाय हुतात्मा एक्स्प्रेससाठी वापरला जाणारा रेक अमरावती एक्स्प्रेससाठीही वापरला जात असल्याने त्या गाडीला उशीर झाल्याचा परिणाम थेट हुतात्मा एक्स्प्रेसवर होत आहे.
---
तीन दिवसांचे उशिराचे चित्र
- शनिवार (ता. १६) : रात्री ९.३० वाजता सोलापूरला पोचणे अपेक्षित असलेली गाडी मध्यरात्री १.३० वाजता पोचली.
- रविवार (ता. १७) : परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली आणि गाडी मध्यरात्री २.३० वाजता सोलापूरला पोचली.
- सोमवार (ता. १८) : सकाळी ६.३० वाजता सोलापूरहून पुण्याकडे सुटणे अपेक्षित असलेली गाडी ९.५० वाजता सुटली आणि पुण्यात दुपारी २ वाजता म्हणजे सुमारे साडेतीन तास उशिराने पोचली. पुण्याहूनही सायंकाळी ५.५० ऐवजी रात्री ८.५० वाजता सुटणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
---
प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
सोलापूर-पुणे दरम्यान दररोज शेकडो नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि रुग्ण प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या नियोजनातील ढिसाळपणामुळे प्रवाशांना स्थानकावर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. रात्री उशिरा गाडी पोचत असल्याने विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com