माऊलींच्या पादुका नेणारे एसटीचालक काशीद म्हणतात...

सागर शिंगटे 
बुधवार, 1 जुलै 2020

कमी वयात सेवेची संधी मिळाली, आयुष्याचे सार्थक झालं.. 
माऊलींच्या पादुका नेणाऱ्या एसटीचालक काशीद यांची भावना 

पिंपरी : माझ्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. माझे चुलते-चुलती आषाढी वारी करत असतात. यंदा "लाल परी'ला मान मिळाला. खूप कौतुकास्पद गोष्ट वाटते. कमी वयात मला माऊलींच्या सेवेची संधी मिळाली. खूप नशीबवान ठरलो. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले.'', अशा शब्दांत वल्लभनगर येथील एसटीचालक तुषार काशीद यांनी भावना व्यक्त केल्या. 

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने यंदा आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पायी नेण्याऐवजी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या बसगाड्यांमधून श्री क्षेत्र पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, माऊलींचा पादुका एसटीमधून नेण्याचा बहुमान वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) एसटी आगाराचे एसटी चालक तुषार काशीद यांना मिळाला. या सोहळ्याच्या प्रवासाचा अनुभव सांगताना काशीद यांनी वरील भावना बोलून दाखविल्या. 

काशीद म्हणाले, "श्री क्षेत्र आळंदी येथून दुपारी 2 वाजता "विठाई' बसमधून माऊलींचा सोहळा मार्गस्थ झाला. माऊलींच्या पारंपारिक पालखी मार्गानेच म्हणजे सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस मार्गे वेळापूर बसचा प्रवास झाला. वाखरी येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोहळा पोचला. वाटेत काही ठिकाणी वारकरी, भाविकांनी पालख्यांवर फुलांची उधळण केली. बसगाडीच्या मागे-पुढे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गाडी कुठे उभी करायची नाही, अशाच आम्हाला सूचना होत्या. 

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

काशीद यांचे बारामती तालुक्‍यातील शिसरने हे मूळगाव. मागील 5 वर्षांपासून ते एसटी महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री क्षेत्र आळंदी देवस्थाननेच "विठाई' एसटी बसवर फुलांची आकर्षक सजावट केली होती. बसच्या आतून आणि बाहेरून फुलांच्या विविध रंगी माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. 

याची थोडी खंत वाटते... 
लाखो वारकरी दरवर्षी आषाढीला माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत पायी जात असतात. यंदा त्यांची वारी हुकली. कोरोनाच्या प्रकोपामुळे वारकऱ्यांना माऊलींचे नीट दर्शनही घेता आले नाही. याची थोडी खंत वाटते,'', असेही तुषार काशीद यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I got the opportunity to serve Panduranga my life became meaningful says kashid