माझी जबाबदारी हलकी करायला आलोय - डॉ. के. सिवन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दोन टप्प्यांत अवकाशवीरांना प्रशिक्षण
गगनयान मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष भारतीय नागरिक अवकाशात सफर करतील, त्यासाठी अवकाशवीरांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण देण्यात येईल. याचा कालावधी सुमारे १५ महिन्यांचा असेल, तर दुसऱ्या टप्प्यातील ६ ते १२ महिन्यांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष यानाच्या कुपीत देण्यात येईल, अशी माहिती डॉ. सिवन यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.

पुणे - सेनापती बापट रस्ता परिसरातील मुक्तांगण विज्ञानशोधिकेमध्ये विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळपासून गर्दी केली होती. ते सर्वजण प्रमुख पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होते. ते आले अन्‌ सभागृहात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, ‘‘मी माझ्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे हलके करायला आलोय, कारण तुम्ही माझे भविष्यातील सहकारी आहात!’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांना स्वतःचे सहकारी समजणारे हे होते, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन. मुक्तांगणमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी तासभर संवाद साधला. या वेळी व्यासपीठावर इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमोद काळे, अनंत भिडे, नंदकुमार काकिर्डे आदी उपस्थित होते. डॉ. सिवन म्हणाले, ‘‘भारताचे भविष्यातील आधारस्तंभ असलेल्या माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, तुम्ही आमची विचारप्रक्रिया आहात. तुमच्यामध्ये मला भविष्यातील न्यूटन आणि सी. व्ही. रामन दिसत आहेत. भविष्यात भारतीय नागरिकाला चंद्रावर नेणारे जर कोणी असले, तर ते तुम्ही आहात. विद्यार्थ्यांनी फक्त अवकाशविज्ञान क्षेत्रात आले पाहिजे असे नाही, तर त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन करावे.’

भारताचे 4 अवकाशवीर प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना

विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा भारत बघत डॉ. सिवन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अवकाश मोहिमा आखल्या जातात. दळणवळण, हवामान आणि आपत्कालीन परिस्थितीची पूर्वसूचना देण्यासाठी उपग्रहांचा वापर करण्यात येतो. यांची कार्यक्षमता वाढवून देशातील लोकांचे जीवनमान उंचाविण्याचा इस्रोचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी गगनयान मोहिमेपासून आदित्य एल : १ या सौरमोहिमेबद्दल डॉ. सिवन यांना प्रश्‍न विचारले. डॉ. नेहा निरगुडकर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I have come to lighten my responsibilities dr k sivan