भारताचे 4 अवकाशवीर प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

देशाची पहिली मानवी अवकाश मोहीम "गगणयान'च्या प्रशिक्षणासाठी 4 अंतराळवीर रशियाला पाठविण्यात आल्याची माहिती, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी आज दिली. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एच.के.फिरोदिया पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. 

पुणे : देशाची पहिली मानवी अवकाश मोहीम "गगणयान'च्या प्रशिक्षणासाठी 4 अंतराळवीर रशियाला पाठविण्यात आल्याची माहिती, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी आज दिली. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एच.के.फिरोदिया पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. सिवन यांना विज्ञानरत्न आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांना विज्ञानभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदी उपस्थित होते. डॉ.सिवन म्हणाले,""गगणयान मोहिमेत सात दिवस अंतराळवीर अवकाशात राहणार आहे. त्यासाठी हवाईदलाकडून निवड करण्यात आलेले 4 अंतराळवीरांना 15 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात आले आहे.'' शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाबरोबरच अवकाशयानाच्या कुपीत राहण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. बंगळूर येथे मानवी अवकाश प्रशिक्षण केंद्रांची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सिवन यांनी यावेळी दिली. 

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

डॉ. मांडे म्हणाले,"तीन पैकी एक व्यक्तीच्या शरीरात आजाराला निमंत्रण देणारे जिवाणू निष्क्रिय अवस्थेत असतात. योग्य संधी मिळाल्यावर ते आपली वाढ करतात. रोज व्यायाम केल्यास आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबिल्यास या जिवाणूंचा 90 टक्के धोका संभवत नाही. आजारांना समजून घेण्यासाठी पेशी, उती, शरीर, मानवी समूह यांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.'' सामान्य माणसांचे रोजच्या जीवनातील समस्यांचे वैज्ञानिक समाधान शोधण्याचे काम सीएसआयआरच्या माध्यमातून केले जाते. तसेच, अवकाश तंत्रज्ञान सामान्य लोकांच्या उपयोगाला कसे पडेल यासाठी इस्रो काम करत असल्याचे अरुण फिरोदिया म्हणाले. देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा.के. विजयराघवन यांनी फिरोदिया पुरस्कारासाठी महिला वैज्ञानिकांची आजपर्यंत निवड न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. डॉ. माशेलकर यांनी पुढील पुरस्कारार्थी हे महिला वैज्ञानिकच असतील असे जाहिर केले. 

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

"इस्रोने फक्त अग्निबाणांचा निर्मिती केली नाही तर, 53 संदेशवहन, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण केले आहे. तमिळनाडूतील कुलासेकरपट्टीनम येथे नवीन प्रक्षेपण स्थळाची बांधणी करण्यात येत आहे. तसेच 10 टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह वाहून नेईल अशा प्रक्षेपकयानाची निर्मितीही आम्ही करत आहोत.'' - डॉ.के.सिवन, इस्रो अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India leaves for 4 Astronaut for training in Russia