सावरकरांबाबतची लढाई मी एकटा लढणार : सोमण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

माझ्या शिवसेनेच्या सांस्कृतिक महोत्सवात येण्याला कोणत्याही पक्षाचा रंग देऊ नये. यापूर्वीही मी सोशल मीडियावर भूमिका मांडलेली आहे आणि यानंतरही मांडत राहीन.

पुणे : ''मी सावरकरवादी आहे, हे विधान करताना मी कुणालाही विचारून वा परवानगी घेऊन केले नव्हते. माझ्या विधानावर मी ठाम आहे. सावरकरांबाबत मी विधान केले असल्याने ही माझी एकट्याची लढाई असून ती मी लढणार आहे,'' असे मत मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक, नाट्यकर्मी योगेश सोमण यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ सोमण यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर मुंबई विद्यापीठात त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले आणि त्यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. 

- शेखर गायकवाड पुण्याचे नवे महापालिका आयुक्त; पदभार स्वीकारला

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पत्रकारांशी बोलताना सोमण म्हणाले, ''मला सक्तीच्या रजेवर पाठविले, या विषयावर मी सध्यातरी बोलणार नाही. याबाबत मला माध्यमांमधूनच समजते आहे. विचार व्यक्त करताना मी कोणाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे माझी भूमिका मी मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीसमोर मांडेन.'' 

- पुणे : वरिष्ठ लिपिकासह तिघावर लाच घेताना कारवाई 

मी कुठल्याच पक्षाचा नाही 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना सोमण म्हणाले, ''मी सावरकरवादी आहे. मी माझी भूमिका ठामपणे वेळोवेळी मांडलेली आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी नाटक शिकवणारा माणूस आहे. तो विषय शिकवण्यासाठी कोणत्याही पक्षाचे निमंत्रण आले, तर मी नक्की जाईन. माझ्या शिवसेनेच्या सांस्कृतिक महोत्सवात येण्याला कोणत्याही पक्षाचा रंग देऊ नये. यापूर्वीही मी सोशल मीडियावर भूमिका मांडलेली आहे आणि यानंतरही मांडत राहीन.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will fight alone for Veer Savarkar says Yogesh Soman