सनदी अधिकाऱ्याची माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

महेश झगडे यांनी मुलीचा लग्न खर्च टाळून केली शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

पुणे - मुलीचं लग्न म्हटलं की बॅंडबाजा... जेवणावळी.. साड्या-दागदागिन्यांचा खर्च... नवऱ्या मुलासह वऱ्हाडी मंडळींचं लाड पुरविणं, असं सारं आलंच नाही का ! परंतु, लग्नात होणारा हा अवाजवी खर्च टाळून अनेकांच्या संसाराची चूल पेटवली तर ? पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून नवा आदर्श घालून दिला आहे. लग्नातील अवांतर खर्चाला कात्री लावत त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देऊ केली आहे.

झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल भालिंगे यांनी अगदी साधेपणाने मंगळवारी विवाह केला आणि विवाहातील खर्चाच्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. खरे तर दोन्ही परिवाराची आर्थिक स्थिती तशी उत्तम. विवाह थाटामाटात करणे दोन्ही परिवारांना शक्‍य होते. मात्र, सामाजिक जाणिवेपोटी दोन्ही घरच्या कुटुंबीयांनी लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरविले आणि लग्नात होणारा खर्च टाळून ती रक्‍कम  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. 

मुलीचे लग्न थाटामाटात करावे, असे सुरवातीला झगडे कुटुंबीयांनी ठरवले होते. मात्र, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे जगणे पाहून या बापाचे मनही कासावीस झाले. मग, आपल्या मुलीचे लग्न साधेपणाने करावे, असं त्यांनी ठरविले. मुलीनेही वडिलांच्या मनातला आवाज ओळखला अन्‌ लग्नाचा झगमगाट बाजूला सारून, त्यांनी सामाजिक जाणिवेतून मदतीसाठी हात पुढे केला. सध्या लग्नाचा झगमगाट सगळीकडे चालू आहे. लाखोंनी पैसे उधळले जात आहेत. त्यात झगडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठीही वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून विवाह सोहळ्यावर होणाऱ्या खर्चात बचत करून, तो निधी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
- महेश झगडे

Web Title: IAS officer of humanity