CA Results : "सीए' परीक्षेत अगरवाल, गोयल प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सनदी लेखापाल (सीए) या जुन्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत देशात जयपूरचा अजय अगरवाल प्रथम, हैदराबादची राधालक्ष्मी व्ही. पी. द्वितीय, तर ठाण्यातील उमंग गुप्ता याने तिसरा क्रमांक मिळविला आहे

पुणे : सनदी लेखापाल (सीए) या जुन्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत देशात जयपूरचा अजय अगरवाल प्रथम, हैदराबादची राधालक्ष्मी व्ही. पी. द्वितीय, तर ठाण्यातील उमंग गुप्ता याने तिसरा क्रमांक मिळविला आहे; तर नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत भोपाळच्या नयन गोयलने देशात प्रथम, बंगळूरच्या काव्या एस.ने दुसरा, तर जयपूरचा अर्पित चित्तोराने तृतीय क्रमांक मिळविला. सीए फाउंडेशन परीक्षेत पुण्यातील रजत राठी हा देशात प्रथम आला आहे. 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) मे-जून महिन्यात घेतलेल्या अंतिम परीक्षा आणि "सीए फाउंडेशन'चा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सीएच्या नवीन अभ्यासक्रमाच्या ग्रुप एकमध्ये एक हजार 500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी 16.87 इतकी आहे, तर ग्रुप दोनचा निकाल 17.55 टक्‍के इतका लागला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक हजार 146 आहे. जुन्या अभ्यासक्रमातील ग्रुप एकचा 18.40 टक्‍के इतका निकाल लागला असून, यात चार हजार 610 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रुप दोनचा निकाल 23.72 टक्‍के लागला असून, यात आठ हजार 762 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

निकालाबाबत "आयसीएआय'च्या विभागीय परिषदेचे सदस्य आनंद जकोटिया म्हणाले, ""संस्थेकडून सीए अभ्यासक्रम आणि भविष्यातील संधी याबाबत शाळांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. परिणामी, निकालामध्येही सुधारणा होत आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICAI Final Foundation Exam Result Released