बांधकाम विभागाचा अजब कारभार!

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

- मुळा-मुठा नदी पुलाची तातडीने दुरुस्ती करायची सोडून राडारोडा आणि झाडे झुडपे आडवे टाकून वाहतूक बंद केली आहे.

- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे पाणी ओसरूनही प्रवाशांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

- शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. 

मांजरी :  येथील मुळा-मुठा नदी पुलाची तातडीने दुरुस्ती करायची सोडून राडारोडा आणि झाडे झुडपे आडवे टाकून वाहतूक बंद केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे पाणी ओसरूनही प्रवाशांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. 

सलग दोन-तीन दिवस पाणी वाहिल्याने मांजरी बुद्रुक च्या बाजूने भरावा वरील काँक्रीटचा थर वाहून गेला होता. त्या ठिकाणी पुन्हा नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल वाहून गेल्याच्या नावाखाली पाणी ओसरूनही चार दिवसापासून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. वाहतूक रोखण्यासाठी विभागाने या ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने राडारोडा आणि झाडे आडवी टाकली आहेत. त्याबाबतचे सूचनाफलकही लावलेले नसल्याने अनेक वाहनांना थेट पुलापर्यंत जाऊन परतावे लागत आहे. त्यामुळे या प्रवाशांना दुहेरी वळसा घेऊन सुमारे पस्तीस चाळीस किलोमीटरचा हेलपाटा पडत आहे. अनेक दुचाकीस्वार यातून धोकादायक प्रवास करीत आहेत. 

या मार्गावर असलेल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज एक दीड तास आधी बस गाठण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. या बसेसनां थेऊर अथवा खराडी मार्गे प्रवास करावा लागत आहे. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने बस चुकल्यास पालकांना दूरच्या मार्गाने विद्यार्थ्याला शाळेपर्यंत सोडावे लागत आहे. नोकरी करणाऱ्यांसह सर्वच पालकांची त्यामुळे धावपळ उडत आहे. हे सर्व घडत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सूस्त आहे.

वाघोली आणि हडपसरकडून येणाऱ्या प्रवाशांना पूल वाहतुकीस बंद असल्याची सूचना त्याच ठिकाणी मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र, अशी माहिती थेट पुलापर्यंत आल्यावरच मिळत आहे. त्यामुळे या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वेळेचाही अपव्यय होत आहे.

"काँक्रिटीकरण वाहिलेल्या ठिकाणी नव्याने काँक्रीट टाकलेले आहे. ते सुकण्यासाठी वाहतूक बंद केली आहे. दोन दिवसात पुलावरील वाहतूक सुरू करण्यात येईल.' 
नानासाहेब परभणे
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ignorance of construction depatment evident at manjri