सम्राट अशोकांच्या सन्नतीकडे दुर्लक्ष - भंते तिस्सावरो

Mahachaitya Stupa
Mahachaitya Stupa

पुणे - मौर्य सम्राट अशोकांची एकमेव उपलब्ध प्रतिमा कर्नाटकात आहे. सन्नतीमधील (ता. चितापूर, जि. गुलबर्गा) येथे ही प्रतिमा असून, या बौद्धस्थळाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सम्राट अशोकांनी अखेरचा श्‍वास तेथे घेतल्याचे मानले जाते. म्हणून सन्नतीला दक्षिण भारतातील प्रमुख बुद्धस्थळ जाहीर करून विकसित करावे, अशी मागणी बुद्ध अवशेष बचाओ अभियानचे प्रमुख भंते तिस्सावरो यांनी केली आहे.

भंते तिस्सावरो पुण्यात आले असून, त्यांनी ‘सकाळ’ला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सन्नती हे भीमा नदीच्या काठी वसलेले गाव आहे. तेथील चंद्रलांबा मंदिर आवारातील काली मंदिराचे छत १९८६ मध्ये कोसळल्यानंतर त्याच्या पायात प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीतील सम्राट अशोकांच्या काळातील मौल्यवान शिलालेख आढळले. भारतीय पुरातत्त्व खात्याने सन्नती व जवळच्या कनगनहळ्‌ळी गावात उत्खनन सुरू केल्यानंतर तिथे महास्तुप आढळला. सिंहासनावर बसलेल्या सम्राट अशोकांचे दगडी शिल्प हा या उत्खनानील महत्त्वाचा शोध ठरला. त्याशिवाय साठ कोरीव घुमट व छतासह अनेक अवशेष सापडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या सन्नतीचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. सप्टेंबर २००९ मध्ये कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने ३.५२ कोटी रुपये निधीतून या ठिकाणी संग्रहालय, डॉर्मिटरी, कर्मचाऱ्यांसाठी निवास आणि संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र, या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांच्या संवर्धनासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत. काही मोजकेच अवशेष संग्रहालयात हलविले आहेत. इमारतीचाही वापर नाही, असे तिस्सावरो यांचे म्हणणे आहे. 

सन्नतीला सम्राट अशोकांचे समाधी स्थळ म्हणून घोषित करावे, दरवर्षी बुद्ध महोत्सव साजरा करावा. त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, आदी मागण्यांसाठी भंते तिस्सावरो केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. तिस्सावरो हे बिहारमधील बोधगया येथील आहेत. लॉकडाउनमुळे या भेटी बंद झाल्याने तेथील भंते अडचणीत आले आहेत. त्यांना केंद्र सरकारने दोन हजार रुपये मानधन सुरू करावे, अशीही त्यांची मागणी आहे.

सम्राट अशोकांनी तीन वेळा दक्षिणेचा प्रवास केला होता. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत सम्राट अशोक सन्नतीमध्ये आले असावेत. तेथेच मृत्यू झाला असावा. कारण, ते उत्तरेत परतल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. 
- भंते तिस्सावरो, बोधगया, बिहार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com