महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच

संदीप घिसे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पिंपरी - महाविद्यालया बाहेर, रस्त्यावर अनेकदा महिलांची छेडछाड होते. त्यातूनही एखादीने तक्रार देण्याचे धाडस दाखविले तर पोलिसांकडून तक्रारदार आणि तिच्या कुटुंबीयांसमोर भविष्यातील न्यायालयाच्या कार्यवाहीबाबत भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो. तक्रार घेऊन रोडरोमिओंच्या मुसक्‍या आवळण्याऐवजी आरोपींकडून ‘तोडपाणी’ केली जाते. दोन पोलिस उपायुक्‍त महिला शहराची कायदा आणि सुव्यवस्था पाहात असतानाच पोलिसांकडून महिलांविषयी अनास्था दिसून येत आहे. 

प्रसंग एक
गुरुवारी (ता. २३) आकुर्डी येथे कामावर चाललेल्या एका तरुणीला तिच्या ‘गुंठामंत्री’ मित्राकडून जबरदस्तीने मोटारीत बसविले जाते. तिचा विनयभंग करीत मारहाणही केली जाते. याबाबत तरुणीने फिर्याद देऊनही गुन्हा दाखल केला जात नाही. उलट भविष्यातील न्यायालयीन कारवाईची भीती दाखवत गुन्हा कसा दाखल होणार नाही, यासाठी पोलिसांकडून नातेवाइकांवर दबाव आणला जातो. अखेर तेच झाले. त्या तरुणीचा गुन्हाच दाखल झाला नाही. याबाबत चौकशी केली असता फिर्याद देण्यास तरुणीने नकार दिल्याचे सांगितले. मग दुपारपासून रात्रीपर्यंत ती तरुणी पोलिस ठाण्यात कशासाठी बसली होती, असा प्रश्‍न निर्माण होतो.

प्रसंग दोन
निगडीत राहणाऱ्या पतीने मारल्यामुळे देहूरोड येथे माहेरी गेलेल्या विवाहितेला नवऱ्याचे घर सोडून आल्याने आईवडिलांनी मारहाण केली. याबाबत ती महिला तक्रार देण्यासाठी रात्री नऊ वाजता निगडी पोलिस ठाण्यात गेली असता तिला हद्दीचे कारण देत देहूरोडला जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर तिची तक्रार घेतली.

जानेवारी २०१५ मध्ये मोशी येथे छेडछाडीला कंटाळून एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. छेडछाड होत असल्याची तक्रार देण्यासाठी ती पोलिसात गेली होती. मात्र, नेहमीप्रमाणे तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. 

पोलिसांच्या नाकर्तेपणाचा ती बळी ठरली. बारामती येथेही एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडल्याने शहरातील रोडरोमिओंचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एखादा पोलिस कर्मचारी तक्रार घेत नसेल तर तक्रारदाराने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधावा. तसेच रोडरोमिओंच्या विरोधात आगामी काळात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
- सतीश पाटील, सहायक आयुक्‍त

Web Title: Ignoring women complaints