esakal | 'आयसर'मधील आग अडीच तासांत आटोक्यात; जीवितहानी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

IISER

'आयसर'मधील आग अडीच तासांत आटोक्यात; जीवितहानी नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (IISER) रसायनशास्त्र प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता आग लागली होती. सुरवातीला प्रयोगशाळेतील एक्झॉस्ट हूड चेंबरमध्ये लागलेली आग अवघ्या काही तासातच दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पसरली. पुणे महापालिका (Pune corporation), पिंपरी-चिंचवड महापालिका (pimpri-chinchawad corporation), संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या (एचईएमआरएल) अग्निशमन दलांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. (IISER Building fire was contained two and a half hours No casualties)

आयसरच्या अधिकृत निवेदनात या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘‘रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी १२ वाजता लागलेली आग अडीच वाजता नियंत्रणात आली. आग लागल्यानंतर तातडीने संपूर्ण इमारत निर्मनुष्य करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना थोडीफार दुखापत झाली त्यांना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. आता त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे,’’ असे निवेदनात म्हटले आहे.

डीआरडीओच्या (DRDO) अग्निशमन दलाचे अधिकारी राकेश कुमार म्हणतात, ‘‘आम्ही पोहोचलो तो पर्यंत महापालिकेच्याही गाड्या दाखल झाल्या होत्या. आतमध्ये आग दिसत होती. पण मोठ्या प्रमाणावर धूर असल्याने आम्ही थेट आत गेलो नाही. बहुतेक प्रयोगशाळेतील एक्झॉस्ट सिस्टम, वातानुकूलित यंत्रणा आणि छताला मोठ्या प्रमाणावर आग लागली असावी. धूर हटल्यानंतर आम्ही आतमध्ये पाहणी करू.’’ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी आणि पुणे पोलिसांनीही घटनास्थळी वेळेवर दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सक्षम करणार; यशोमती ठाकूर

अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी

प्रयोगशाळेतील दोन्ही मजल्यांवर आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होता. बचाव कार्याच्या दृष्टीने हा धूर लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. म्हणून पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच अधिकाऱ्यांचा गट मजल्यांवर पोचून तावदानांच्या काचा फोडण्यास सुरवात केली. त्यावेळी अग्निशामक वाहन चालक करीम पठाण यांच्या हाताला दुखापत झाली. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने उपाययोजना केली.

हेही वाचा: रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने, मोबाईल पोलिसांनी केली जप्त

पुढील काही दिवस प्रयोगशाळा बंद

आगीच्या कारणांचा तपास आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पुढील काही दिवस प्रयोगशाळेच्या इमारतीत प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, येत्या काळातील आगीच्या दृष्टीने आवश्यक ते बदल आणि खबरदारीच्या उपायांसाठीही आढावा घेण्यात येणार आहे. या आधीही आयसरमध्ये दोन छोटे अपघात घडले होते. त्या पार्श्वभूमीवर आयसर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स

शुक्रवारी दुपारी १२ वाजून ११ मिनीटांनी आम्हाला आयसरमधील आगीची खबर मिळाली. त्यानंतर १० मिनीटात सात अग्निशामक बंब, पाण्याचे टॅंकर, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, बीएसेट व्हॅन घटनास्थळी पोचल्या. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग व धुर मोठ्या प्रमाणात होता. ५० कर्मचारी व १० अधिकाऱ्यांच्या मदतीने २ वाजून ३६ मिनीटांनी आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण व किती नुकसान झाले आहे हे समजू शकलेले नाही.

- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पुणे महापालिका

loading image