#PuneCrime 'बुलेटराजां'ची वाढतेय दहशत

#PuneCrime 'बुलेटराजां'ची वाढतेय दहशत

पुणे - गुन्हेगारांप्रमाणेच पिस्तूल बाळगण्याची अभिषेक दीक्षित या तरुणाची हौस असते आणि ‘ती’ पूर्णही होते. मुंढव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये मैत्रिणीवर शेरेबाजी करणाऱ्यांवर पिस्तूल उगारून हवेत गोळीबार करणारा मित्रही पुण्यातच असतो. इतकेच काय, इथे तर रिक्षाचालकही कमरेला पिस्तूल लावून फिरतो. शहरात कोणीही पिस्तूल वापरतो, कुठेही, कधीही आणि कोणत्याही कारणासाठी गोळ्या झाडतो ! पोलिसांचा धाक नसल्यानेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांना अर्थात बुलेटराजांना मोकळे रान मिळाले आहे.

किरकोळ कारणासाठी वापर 
शहराचे विस्तारीकरण जसजसे झाले, तसतसे वेगवेगळ्या घटकांच्या हातात चांगला पैसा आला. त्यामुळे गुन्हेगारांचेही डोळे चमकू लागले. परिणामी, बेकायदा पिस्तुलाला मागणी वाढली. एखाद्याला धमकावणे, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, चोरी, जबरी चोरी, स्वसंरक्षणापासून अगदी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठीही पिस्तुलाची खरेदी होऊ लागली. अशा व्यक्तीच दलालांकडून २०-३० हजार रुपयांमध्येच बेकायदा शस्त्र विकत घेऊन पुढे त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ लागला. 

परराज्यांतून तस्करी
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थानमधून पिस्तूल, गावठी कट्टे अन्‌ शस्त्र तस्करांकडून पुण्यात आणले जातात. मध्य प्रदेशात दावलबेडी, उंडीखोदर, सिरवेल, सिंगनू, अंबा, नवलपुरा, सीतापुरा या भागांत शस्त्र बनविली जातात. धुळे, जळगाव येथील सीमाभागातूनही पिस्तूल आणले जात होते. 

कारवाई होते; तरीही मर्यादा
बेकायदा शस्त्रविक्री करणारे दलाल किंवा शस्त्र खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. तरीही पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याबरोबरच बेकायदा शस्त्र पुण्यात येऊच नयेत, यासाठीची कारवाई करण्यास पोलिसांना वेगवेगळ्या कारणांमुळे मर्यादा येत असल्याचेही नाकारता येत नाही.

गोळीबाराच्या घटना आणि पिस्तूल बाळगणाऱ्यांवर वचक बसावा, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
- प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) 

बेकायदा पिस्तूल बाळगणारेच गल्लीबोळात दहशत पसरवितात. त्यांच्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
- केतन वानखेडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com