नैसर्गिक ओढे-नाले गायब!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बिबवेवाडी - गंगाधाम परिसरातील नैसर्गिक ओढे-नाले बांधकाम व्यावसायिकांनी गायब केले आहेत. या नाल्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले असून, प्रत्यक्षात टोलेजंग इमारतींनी त्यांचे पात्र गिळंकृत केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

केवळ कागदावरच...

गंगाधाम परिसरात टेकड्यांवरून नैसर्गिक ओढेनाले वाहत होते; परंतु गेल्या काही वर्षांत परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे ओढे-नाले गायब केले आहेत. अस्तित्वात असलेल्या ओढे-नाल्यांवरही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. प्रायमो कंपनीच्या नकाशानुसार महापालिकेत कागदोपत्री ओढे-नाले दिसतात; परंतु प्रत्यक्ष जागेवर ते दिसत नाहीत.

पत्रे ठोकून ताबा

महापालिकेने गंगाधाम चौकात आनंदनगरच्या बाजूने येणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहासाठी कल्वर्टर (पाइप) टाकले आहेत; परंतु प्रत्यक्षात ओढेच नाहीत. चौकातील डाव्या बाजूला गंगाधाम सोसायटीच्या बाजूने येणाऱ्या ओढ्याला आनंदनगरच्या बाजूने येणारा ओढा मिळतो; परंतु कल्वर्टरपासून काही मीटर ओढा उघडाच आहे. बाजूने पत्रे मारून ओढ्यावर अतिक्रमण केले आहे.

बांधकामांना धोका

ओढ्यात शत्रुंजय मंदिर रस्त्यावरून येणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे पाणी साठून राहत आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या ओढ्यांच्या प्रवाहात बदल केले असल्यामुळे पावसाळ्यात गंगाधाम चौकात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर टेकडीवरील माती वाहून येत असते. त्यामुळे चौकात पाणी अडून साठून राहते. भविष्यात मोठा पाऊस झाला तर ओढ्याच्या परिसरातील बांधकामांना धोका निर्माण होऊ शकतो.

कारवाईची मागणी

ओढेनाले गायब झाल्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नसून, माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जाते. ओढ्यांचे पात्र बुजवून त्यावर बांधकामे केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Web Title: illegal construction in gangadham chowk area