बाप रे, गाडीची काच फोडून तो कंटेनर घुसला आत

रुपेश बुट्टेपाटील
Thursday, 17 September 2020

एमआयडीसी भागात मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आणि गाडी बाहेर माल भरून वाहतूक केली जात असल्याने ती नागरिकांना जीवघेणी ठरत आहे.

आंबेठाण : एमआयडीसी भागात मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आणि गाडी बाहेर माल भरून वाहतूक केली जात असल्याने ती नागरिकांना जीवघेणी ठरत आहे. कमी वाहतुकीत जास्त माल वाहतूक करता यावी आणि त्या माध्यमातून अधिक नफा शिल्लक रहावा या हेतूने धोकादायक आणि जीवघेणी वाहतूक केली जात आहे. एकीकडे अपघातास निमंत्रण देणारी अशी धोकादायक वाहतूक रोखण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे या भागात आरटीओचे अधिकारी येतात परंतु सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून दंड वसुली केली जाते पण बड्याना मात्र यात सूट दिली जात असल्याने वाहतूक विभागाच्या कारवाईवर शंका व्यक्त केली जात आहे.

अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

चाकण एमआयडीसीच्या चारही टप्प्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि जोखमीची वाहतूक केली जात आहे. लोखंडी प्लेट, बांधकामाचे स्टील, कागदी बंडल, मोठमोठ्या मशिन अशी बरीच अवजड वाहतूक या भागात होत असते. परंतु ही वाहतूक करताना बऱ्याच वेळा माल गाडीबाहेर आलेला असतो.

माल बाहेर आल्यानंतर त्याला धोक्याची सूचना देणारी काहीही व्यवस्था केली जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आंबेठाण येथे तर कागदी बंडल घेऊन जाणाऱ्या गाडीतून बंडल खाली पडून एका पादचारी इसमाला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच एका अपघातात एक कंटेनरचा धक्का लागून चारचाकीचे नुकसान झाले.

तसेच भांबोली येथे एक महिला जागीच ठार झाली होती. दोन दिवसांपूर्वी वराळे येथे भरधाव मालवाहू गाडीने एकाचा पाय मोडला असून त्याला कायमचे अपंग व्हावे लागले.एकंदरीत अशा अवैध वाहतुकीने अपघात आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भागाचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात केल्यानंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या भागात वरच्यावर फेऱ्या होतात परंतु केवळ दुचाकीस्वार आणि लहान चारचाकी वाले यांनाच त्यांच्याकडून कायद्याचा बडगा दाखविला जात आहे. रस्त्याच्या कडेला अवैधपणे उभी राहून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने, बेकायदा प्रवाशी वाहतूक, कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर होणारी बेकायदा पार्किंग, ओव्हरलोड माल भरलेली वाहने यांच्यावर कारवाई करण्याला मात्र वाहतूक विभाग धजावत नाही. सर्वसामान्य नागरिकांना दंड फाडायला लावणारा वाहतूक विभाग या बड्या धेंडांवर कारवाई करणार का?असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal traffic from chakan MIDC