'पीएमपी'ला सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री आले धावून; दोन्ही महापालिकांना दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

पीएमपीची बस वाहतूक 25 मार्चपासून बंद झाली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱयांसाठी पीएमपीची वाहतूक सुरू आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे पीएमपीला दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचा  तोटा होत आहे.

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी पीएमपीला संचलनातील तूट भरून काढण्यासाठी तातडीने रक्कम द्यावी तसेच दोन्ही शहरांतील पीएमपीची बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय लगेचच घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी बस वाहतूक सुरू करण्याची तयारी पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. 

बापरे! आंबेगाव तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कोरोनाग्रस्त!

शहरातील कोरोनाच्या संसर्गामुळे तयार झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी शुक्रवारी पुण्यात बैठक घेतली. त्या दरम्यान, पीएमपीच्या बसची वाहतूक पुरेशी काळजी घेऊन सुरू करावी, अशी माझी इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या बाबत दोन्ही महापालिका आणि पीएमपीने एकत्रितपणे वाहतूक कशी सुरू करायची हे ठऱावावे, असे त्यांनी सांगितले. तसेच संचलनातील तूट भरून काढण्यासाठी पीएमपीची ठरलेली रक्कम महापालिकांनी त्वरित द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. दरम्यान, या बाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, बस वाहतूक सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. पुढील आठवड्यात बस वाहतूक सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!​

दोन्ही शहरांतील बस वाहतूक सुरू करावी, अशी मागणी पीएमपीने दोन वेळा दोन्ही महापालिकांकडे केली आहे. पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनीही त्या बाबतचे पत्र दोन्ही महापालिकांना दिले आहे. पीएमपीने दिलेल्या प्रस्तावानुसार, सुरवातीच्या टप्प्यात कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र वगळून दोन्ही शहरांतील किमान 30 मार्गांवर वाहतूक सुरू करण्यात येईल. बसमध्ये क्षमतेच्या निम्मेच प्रवासी घेतले जातील. तसेच प्रत्येक बसचे दिवसातून किमान तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येईल. त्या बाबत अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या  आहेत. तसेच बसमधील वातानुकूल यंत्रणा सुरू करण्यात येणार नाही, असेही पीएमपीने या पूर्वीच दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 

काय म्हणावं या पुणेकरांना! प्रशासनाचे आदेश झुगारत खडकवासल्यावर केली गर्दी​

पीएमपीची बस वाहतूक 25 मार्चपासून बंद झाली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱयांसाठी पीएमपीची वाहतूक सुरू आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे पीएमपीला दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचा  तोटा होत आहे. वाहतूक बंद असल्यामुळे पीएमपीने सुमारे पाच हजार कर्मचाऱयांना दोन्ही महापालिकांच्या सेवेत पाठविले आहे. बस वाहतूक सुरू करावी, अशी मागणी दोन्ही शहरांतील नागरिक करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही दोन दिवसांपूर्वी त्यासाठी आंदोलन केले होते. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक संघटनांनीही बस वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. 

पालकमंत्री पवार यांनी बस वाहतूक सुरू करण्यासाठी दिलेल्या आदेशामुळे पीएमपीच्या कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता त्यासाठी प्रशासकीय तयारीही सुरू झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important order given by Deputy CM Ajit Pawar to PMC and PCMC for transport between Pune and Pimpri Chinchwad