esakal | दापोडीत हवालदाराला पोलिस शिपायाने केली गजाने मारहाण

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज
दापोडीत हवालदाराला पोलिस शिपायाने केली गजाने मारहाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नाकाबंदीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलिस हवालदाराला पोलिस शिपायाने लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना दापोडीतील हॅरिस ब्रिज येथे घडली.

किसन विठोबा गराडे (वय ५२) असे मारहाण झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई सुरज जालिंदर पोवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस ब्रिजवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. पोलिस हवालदार गराडे हे वाकड पोलीस ठाण्यात तर पोलिस शिपाई पोवार भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी (ता.२२) दोघांची ड्युटी नाकाबंदी पॉईंटवर लावण्यात आली होती.

दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी पोवार याला फोनवर सांगितले. त्यावरून 'तू मला कोण सांगणारा’ असे बोलून पोवार याने गराडे यांना गजाने मारले. यात हवालदार गराडे जखमी झाले. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.