पिंपरी-चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश करा - लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

शहरात 2008 नंतर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांना तिप्पट मिळकत कर (शास्तीकर) आकारला जात आहे. तो रद्द करण्यासाठीही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेकडून मूळ मिळकतकरापाठोपाठ शास्तीकराचेही बिल पाठविले जात आहे. अनेक मिळकतधारकांकडे शास्तीकराची लाखोंची थकबाकी आहे. त्यामुळे शास्तीकर रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

शहराच्या विविध महत्त्वाच्या प्रश्‍नांसंदर्भात जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी नवी मुंबई या योजनेतून बाहेर पडत असेल तर तिच्याऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला त्यांनी अनुकूलता दर्शविल्याचे जगताप यांनी सांगितले. या भेटीत अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर रद्द करण्याबाबतही जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील दहा शहरे आहेत. या शहरांनी निकष पूर्ण केल्यानंतर त्यांचा टप्प्याटप्प्याने योजनेत समावेश केला जात आहे. दहा शहरांत नवी मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. राज्यातील अन्य नऊ शहरे स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण करीत असताना नवी मुंबई महापालिका मात्र त्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. तेथील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस नवी मुंबईचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याबाबत नकारात्मक सूर लावीत आहे. त्यामुळे ही महापालिका स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. म्हणून त्या जागी पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी, नवी मुंबई महापालिका या योजनेविषयी काय पाऊल उचलते याकडे आपले लक्ष आहे; ते योजनेत सहभागी होणार नसतील, तर सरकार पिंपरी-चिंचवडचा प्राधान्याने विचार करेल,‘ असे स्पष्ट केले आहे.

Web Title: include pimpri-chinchwad in Smart City