मिळकतकराचा बोजा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दरवर्षी पाणीपट्टीवाढीचा बोजा पुणेकरांवर पडत असतानाच मिळकतकर आकारणीसाठी ठरविण्यात आलेल्या वाजवी भाडे दरास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरात यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या मिळकतींच्या मिळकतकरात मोठी वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे निवासी मिळकतीमधील ‘साइड मार्जिन’, कॉमन पॅसेज-लॉबी, पार्किंग, जलतरण तलाव आणि व्यावसायिक वापर सुरू असलेले ओपन टेरेस यावरही मिळकतकर आकारला जाणार आहे.

 महापालिका करसंकलन विभागाने मिळकतकर आकारणीसाठी वाजवी भाड्याचा सुधारित दर ठरविण्याच्या ठरावास आयुक्त कुणाल कुमार यांनी पदभार सोडण्यापूर्वी मंजुरी दिली आहे. या नवीन वाजवी भाडे दरानुसार मिळकतकराची आकारणी करावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. 

महापालिका हद्दीतील विविध हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट आदी व्यावसायिक वापराच्या मिळकतीमधील इतर जागाही मिळकत कराच्या कक्षेत आणल्या गेल्या आहेत. या बिगर निवासी मिळकतीमधील साइड मार्जिन, कॉमन पॅसेज, पार्किंग, त्याचप्रमाणे ओपन टेरेसचा व्यावसायिक वापर होणाऱ्या मिळकती, काही मोकळ्या जागांचा टेबल टेनिस, टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन आदी खेळांसाठी केला जातो. काही मिळकतींमध्ये जलतरण तलावही बांधण्यात आले आहेत. या सर्व मिळकतींना १ एप्रिलपासून बिगर निवासी दराने मिळकत कर आकारणी करावी, असा ठराव प्रशासनाने ठेवला होता. त्यास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार मिळकतकर आकारणी करण्याचे आदेशही प्रशासनाने मिळकतकर आकारणी आणि संकलन विभागाला दिले आहेत. 

निवासी आणि बिगरनिवासी जांगावरील आरसीसी, लोड बेअरिंग, पत्रा शेड, कार्यालय आदी प्रकारांतील मिळकतींचे मिळकत कर ठरविण्यासाठी महापालिकेकडून प्रतिचौरस फुटांप्रमाणे वाजवी भाडे ठरविले जाते. रेडीरेकनरनुसार शहरातील ५३ विभागांत ६०० विभाग केले गेले आहेत. वाजवी भाडे दराच्या आधारे या भागातील मिळकतकर ठरविला जातो. निवासी वापराच्या मिळकतीमध्ये २५ पैसे, बिगर निवासी (५० पैसे), मोकळ्या जागा (१० पैसे), विकसित मोकळ्या जागा (२० पैसे), निवासी पार्किंग (१० पैसे), बिगरनिवासी पार्किंगसाठी प्रतिचौरस फुटासाठी २० पैसे इतकी वाढ केली गेली आहे. यामुळे शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या मिळकतींचा कर वाढणार आहे.  

एकूण मिळकती - ८,७२,३०६
निवासी - ७,१७,०१५
बिगर निवासी - १,१०,१२४
मोकळ्या जागा - २८,७५७

Web Title: Income tax will increase pune news