मिळकतकर जूनपूर्वी भरल्यास सवलत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

महापालिकेची घोषणा; सामान्य करात ५ ते १५ टक्के सूट मिळणार
पिंपरी - चालू आर्थिक वर्षात (२०१७ -१८) थकबाकीसह मिळकतकर ३० जूनपूर्वी एकरकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात ५ ते १५ टक्‍क्‍यांपर्यंतची सवलत दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केले आहे.

महापालिकेची घोषणा; सामान्य करात ५ ते १५ टक्के सूट मिळणार
पिंपरी - चालू आर्थिक वर्षात (२०१७ -१८) थकबाकीसह मिळकतकर ३० जूनपूर्वी एकरकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात ५ ते १५ टक्‍क्‍यांपर्यंतची सवलत दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केले आहे.

महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे (करसंकलन) यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. ३० जून २०१७ पूर्वी मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाचा एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना विविध सवलत योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येईल. तसेच डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी ३० जून २०१७ अखेर मिळकतकराचा ऑनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सवलत व त्यापुढे ३१ मार्च २०१८ अखेर भरणा केल्यास चालू वर्षाच्या सामान्य करात दोन टक्के सवलत मिळणार आहे.

शौर्यपदक विजेते, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद सैनिक यांना मिळकतकरात १०० टक्के तर, महिलेच्या नावाने असलेल्या एका निवासी घराला ५० टक्‍क्‍यांपर्यंत मिळकतकरात सूट देण्यात आली आहे. माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी हे स्वतः राहत असलेल्या फक्त एक निवासी घर केवळ महिलेच्या नावे असलेल्या आणि स्वतः राहत असलेल्या केवळ एक निवासी घर, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अंध-अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावे असलेल्या मिळकतींच्या मिळकतकरात प्रत्येकी ५० टक्‍क्‍यांची सवलत दिली जाईल. थकबाकीसह मिळकतकराची संपूर्ण रक्कम आगाऊ भरल्यास स्वतंत्र नोंद असलेल्या मिळकतीला दहा टक्के तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी इत्यादींना पाच टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम प्रमाणपत्र प्राप्त मिळकतीच्या करात ५ ते १५ टक्‍क्‍यांची सूट दिली जाणार आहे. सर्व १६ करसंकलन विभागीय कार्यालये, महापालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयामध्ये सार्वजनिक व साप्ताहिक सुटीचे दिवस वगळून सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तसेच www.pcmcindia.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: incometax concession before june