'बीआरटी' मार्गावरील 'डिजिटल स्क्रीन' ऑफ; प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

प्रवाशांना जलद, सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी बससेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे बीआरटीएस ही जलद बससेवा सुरु करण्यात आली. त्यासाठी विशेष मार्गिकाही तयार करण्यात आल्या. बरेच अडथळे पार केल्यावर काही मार्गांवरुन बीआरटीएस सेवेला सुरुवात झाली. परंतु, प्रवाशांना अजूनही व्यवस्थित सेवा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

पिंपरी : चार महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी-निगडी, सांगवी-किवळे, नाशिक फाटा- वाकड आणि काळेवाडी फाटा-देहू आळंदी या सर्व बीआरटीएस मार्गावरील सुमारे 85 बसथांब्यांवरील सर्व वेळापत्रक दर्शक 'डिजिटल स्क्रीन' बंद पडले आहेत. याशिवाय, अनेक सीएनजी बसगाड्यांचेही 'डिजिटल स्क्रीन' फलक बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, प्रवाशांना बसगाड्यांचे वेळापत्रक आणि त्यांची येण्या-जाण्याची वेळ समजणे मुश्‍कील झाले आहे.
 
प्रवाशांना जलद, सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी बससेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे बीआरटीएस ही जलद बससेवा सुरु करण्यात आली. त्यासाठी विशेष मार्गिकाही तयार करण्यात आल्या. बरेच अडथळे पार केल्यावर काही मार्गांवरुन बीआरटीएस सेवेला सुरुवात झाली. परंतु, प्रवाशांना अजूनही व्यवस्थित सेवा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील मुंबई-पुणे महामार्गावर दापोडी ते निगडीपर्यंत 'बीआरटीएस'चा 12.50 किलोमीटर अंतराचा मार्ग असून त्या मार्गावर सर्वाधिक म्हणजे सुमारे 36 बसथांबे आहेत. सांगवी ते किवळे मार्गावर 21 बसथांबे असून हा मार्ग 14.50 किलोमीटरचा आहे. तर नाशिकफाटा ते वाकड असा 8 किलोमीटरच्या बीआरटीएस मार्गावर 15 बसथांबे आहेत. तर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी पर्यंतच्या 8.50 किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस मार्गावर जवळपास 19 बसथांबे आहेत. 

दापोडी-निगडी मार्गावर येताना आणि जाताना बसथांबे आहेत. तेथे स्वतंत्र "डिजीटल स्क्रीन' बसविण्यात आले आहेत. त्यांची संख्या जवळपास 30 आहे. काही ठिकाणी स्क्रीनच बसविण्यात आलेले नाहीत. सांगवी फाटा ते मुकाई चौक (किवळे) पर्यंतचे अंदाजे 19 तर नाशिक-फाटा ते वाकडपर्यंतच्या मार्गावरील 15 स्क्रीन बंद पडले आहेत. 

"पूर्वी बसचा वेळापत्रक दर्शक डिजीटल स्क्रीन चालू असल्याने प्रवाशांना बस कधी येईल याचा अंदाज येत होता. मात्र, अनेक महिन्यांपासून हे फलक बंद पडले आहेत. त्यामुळे, बस कधी येणार याचा अंदाज लागत नाही. "पीएमपी'च्या वेबसाईटवरही निश्‍चित माहिती कळत नाही. याशिवाय, अनेक बसमधील आणि बाहेरील एलईडी पॅनेल देखील बंद असतात. त्यामुळेही प्रवाशांची कुचंबणा होते.''
- मायकेल वर्गीस, विद्यार्थी (सॉफ्टवेअर डेव्हलपर) 

"मागील 4 महिन्यांपासून बसथांब्यांवरील डिजिटल स्क्रीन बंद आहेत. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे. आम्ही संबंधित कंत्राटदाराला नोटिसा बजाविल्या असून दंडात्मक कारवाईही करत आहोत. लवकरच त्याच्यासमवेत बैठक बोलवून प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु.''
- अनंत वाघमारे, व्यवस्थापक (बीआरटीएस), पीएमपीएमएल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inconvenience of passengers caused Digital Screen on BRT route are not working