पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय 

दीपेश सुराणा 
रविवार, 17 जून 2018

पिंपरी : पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांची सध्या चांगलीच गैरसोय होत आहे. पर्यायाने, त्यानंतर सुटणाऱ्या लोकलला प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वांचीच अडचण होत आहे. 

पिंपरी : पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांची सध्या चांगलीच गैरसोय होत आहे. पर्यायाने, त्यानंतर सुटणाऱ्या लोकलला प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वांचीच अडचण होत आहे. 

लोहमार्ग दुरूस्ती व अन्य कामांसाठी 1 जूनपासून पुणे-लोणावळा दरम्यान सध्या लोकल सेवा बंद आहे. दुपारी 12:15, 1.00 आणि  3.00 या वेळेत पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी पुणे-लोणावळा लोकल बंद ठेवली आहे. त्याशिवाय, लोणावळा स्थानकावरून दुपारी 2.00 आणि 3:40 वाजता सोडण्यात येणारी लोकलही सध्या चालू नाही. तळेगाव स्थानकावरून सुटणारी दुपारी 4:38 वाजताची तळेगाव-पुणे लोकल देखील बंद आहे. 30 जूनपर्यंत दुपारच्या लोकल बंद राहणार आहेत. महाविद्यालय, क्‍लासला जाणारे विद्यार्थी, नोकरी-व्यवसायावरून परतणारे नोकरदार, व्यावसायिक यांना इच्छित स्थळी पोचण्यास विलंब होत आहे. दुपारच्या लोकल बंद असल्याने लोकलेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस, रिक्षा आदी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. 

मला दररोज दुपारी 4.00 वाजता सॉफ्टवेअरच्या क्‍लाससाठी कासारवाडी येथून आकुर्डीला यावे लागते. मात्र, सध्या दुपारी 3:20 वाजता कासारवाडीला येणारी पुणे-लोणावळा लोकल बंद आहे. त्यामुळे मला क्‍लासला पोचायला दररोज 15 ते 20 मिनिटे उशीर होत आहे. 
- विशालकुमार सिंह, विद्यार्थी

दुपारी 3:11 वाजता खडकी येथे येणारी पुणे-लोणावळा लोकल बंद आहे. त्यामुळे कामावर परतताना उशीर होतो. दुपारच्या लोकलनंतर येणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची खूप गर्दी असते. पर्यायाने खुप त्रास होतो. बंद केलेल्या लोकल लवकरात लवकर सुरू करायला हव्या. 
- रवींद्र बारी, नोकरदार

पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याबद्दल प्रवाशांच्या माहितीसाठी "अनाऊन्सिंग' केले जाते. त्याशिवाय, दोन्ही फलाटांवर त्याबाबत माहितीफलक लावलेला आहे. प्रवाशांना पूर्ण सहकार्य दिले जात आहे. 
- रतन रजक, स्टेशनमास्तर, आकुर्डी रेल्वे स्टेशन 

Web Title: inconvenience of passengers due to the pune-lonavla local was closed in the afternoon