
कोरोनामुळे मास्क हा आपल्या रोजच्या पेहरावाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंतु हा मास्क कोरोनासारख्या विषाणूंना रोखण्यास सक्षम आहे का, असा प्रश्न आहे
एक रुपयांत वाढवा मास्कची विषाणूरोधी क्षमता
पुणे- कोरोनामुळे मास्क हा आपल्या रोजच्या पेहरावाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंतु हा मास्क कोरोनासारख्या विषाणूंना रोखण्यास सक्षम आहे का, असा प्रश्न आहे. अशा मास्कची विषाणूरोधक क्षमता वाढविण्यासाठी पुण्यातील डॉ. अभय शेंड्ये यांनी जैविक द्रावण विकसित केले आहे.(Increase antiviral ability of the corona mask with one rupee)
सर्वसामान्य नागरिक बाजारातील अथवा घरगुती कापडी मास्क वापरतात. निश्चितच हा मास्क एन९५ मास्क इतका विषाणूरोधी असेलच असे नाही. तसेच पुन्हा पुन्हा वापरात येत असल्यामुळे मास्कवरील जिवाणू आणि विषाणूंचा पूर्ण नाश होईलच असे नाही. यावर उपाय म्हणून डॉ. शेंड्ये यांनी रिडॉल व्हायरस नावाचे जैविक द्रावण विकसित केले आहे. इंग्लंडच्या प्रयोगशाळेने या द्रावणाला IS 18184-2019 हे आंतरराष्ट्रीय विषाणूरोधक मानक दिले आहे.
जैविक द्रावणाची वैशिष्ट्ये
- कायटोसान या नैसर्गिक घटकाबरोबर पेटंटेड प्रक्रियेचा वापर
- मास्क या द्रावणात बुडविल्यास त्याची विषाणूरोधक क्षमता वाढते
- रोज आठ तास याप्रमाणे पाच दिवस द्रावणाचा परिणाम दिसून येतो
- या जैविक घटकाचे आवरण असलेला कपडा दोन तासांत ९७ टक्के विषाणू मारत असल्याचा दावा
- सेंद्रिय पदार्थांचे जैविक द्रावण असल्यामुळे कोणताही साइड इफेक्ट नाही
द्रावणाचा फायदा
- कापडी मास्क अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होईल
- प्रत्येकवेळी वैद्यकीय मास्कची गरज पडणार नाही
- मास्कचा पुनर्वापर वाढेल
- मास्क बरोबरच रुमाल, रुग्णालयातील कपडे आणि चादरीसाठी हे द्रावण वापरता येईल
- मास्कद्वारे संसर्गाला आळा बसेल
- दिवसाला एक रुपयांपेक्षा कमी खर्च
दीर्घकाळ मास्क वापरला की त्यावर जंतू साठतात त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. या द्रावणात बुडविलेला मास्क ९७ टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना विषाणूंना रोखत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. तसेच म्युकरमायकोसिस, न्यूमोनिया आदींचा संसर्ग रोखण्यासाठीही या द्रावणाचा फायदा होतो, असं संशोधक डॉ. अभय शेंड्ये म्हणाले आहेत.