टॅंकरच्या मागणीमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे -  खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टॅंकरची मागणी १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्यातच महापालिकेकडे टॅंकरची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना खासगी टॅंकरशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे पाण्यासाठी त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. 

धायरी परिसरातील पाणीपुरवठादारांनी टॅंकरला पाणी देणे बंद केल्याने या भागातील रहिवाशांचे सध्या हाल होत आहेत. त्यांच्या सोयीसाठी महापालिकेने पुरेसे आणि वेळेत टॅंकर पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भागात बुधवारी सकाळपासून महापालिकेच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

 शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पावणेचार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातच काही भागात गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात रोज सरासरी टॅंकरच्या चारशे फेऱ्या होत होत्या. यंदा मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून ही संख्या साडेचारशेवर पोचली आहे. शहराच्या विविध भागांत सोमवारी ४४५ आणि मंगळवारी ४५२ टॅंकरने (फेऱ्या) पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. पुढील काही दिवसांत ही संख्या पाचशेपर्यंत जाण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने नियोजन महापालिकेने केले आहे.

महापालिका नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पुरेसे टॅंकर उपलब्ध करून देत आहे. धायरीतील रहिवाशांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मजलकेंद्रात वेळेत टॅंकर भरून देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या फेऱ्या वाढण्यास मदत होत आहे.
-प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: Increase in demand for water tankers