esakal | हवेली पोलीस ठाणे हद्दीत नाकेबंदी नावाला; नागरिकांच्या मुक्त संचाराने रुग्णसंख्येत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Blockade

हवेली पोलीस ठाणे हद्दीत नाकेबंदी नावाला; नागरिकांच्या मुक्त संचाराने रुग्णसंख्येत वाढ

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलीस व होमगार्ड जवान यांच्याकडून कोणत्याही प्रकारची विचारपूस केली जात नसल्याने नाकाबंदी केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र दिसून येत असून नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असल्याने हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, किरकटवाडी व खडकवासला ही गावे प्रशासनाकडून हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. सध्या नांदेड येथे 122, किरकटवाडी येथे 77 तर खडकवासला येथे 69 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील आठवड्यात पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी या गावांना भेट घेऊन नाकाबंदी कडक करुन विनाकारण फिरणारांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी फाटा, खडकवासला धरण चौक या ठिकाणी हवेली पोलीस ठाण्याकडून नाकाबंदीसाठी पोलीस कर्मचारी व होमगार्डचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी तैनात असलेले कर्मचारी एका बाजूला बसून मोबाईल मध्ये व्यस्त असतात. कोण येते आणि कोण जाते याकडे साधे पाहिले सद्धा जात नाही. दिवस-रात्र हीच परिस्थिती असल्याने सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा रुग्णसंख्या कमी होण्यासाठी उपयोग होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राऊंडची गाडी निघाली की 'खबर' जाते

पोलीस ठाण्यातून अधिकाऱ्यांची राऊंडची गाडी निघाली की सर्व नाकाबंदीच्या ठिकाणी ताबडतोब 'खबर' पोचते. झोपलेले, मोबाईल मध्ये व्यस्त असलेले पोलीस व होमगार्ड जवान पटकन 'सावध' होऊन गाडी येण्याच्या वेळी उभे असतात. एकदा साहेबांची गाडी निघून गेली की पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती झालेली असते.

'मी स्वत: फिरुन नाकाबंदी व्यवस्थित करण्याबाबत सुचना देत आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड जवान आढळून येत नाहीत त्यांची नोंद स्टेशन डायरीत घेतली जात आहे."

- राहुल आवारे, पोलीस उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे.

loading image