Pune Crime News : बारामतीतील चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना ; नागरिक हैराण

शहरातील बसस्थानकावर महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनेत कमालीची वाढ होत असून गेल्या काही महिन्यात अनेक महिलांचे दागिने चोरटयांनी हातोहात लंपास केलेले आहेत.
Pune Crime News
Pune Crime Newssakal

बारामती : शहरातील बसस्थानकावर महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनेत कमालीची वाढ होत असून गेल्या काही महिन्यात अनेक महिलांचे दागिने चोरटयांनी हातोहात लंपास केलेले आहेत. या पैकी एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

जुन्या बसस्थानकावर व नवीन बसस्थानक झाल्यानंतरही महिलांच्या पिशवीतील तसेच पर्समधील दागिने हातचलाखीने चोरल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी फिर्याद नोंदवून घेतली जाते, प्रत्यक्षात या घटनांचा तपास नेमका कसा केला जातो, त्यात पोलिस काय करतात याची फिर्यादीला कधीच माहिती दिली जात नाही. आपल्या चोरीच्या तपासाबाबत चौकशी केल्यानंतर केवळ तपास सुरु आहे इतके मोघम उत्तर फिर्यादाला ऐकावे लागते.

केवळ दागिन्यांच्या चोरीचाच विषय नसून मोटारसायकल चोरीच्याही दैनंदिन घटना बारामतीत होत असून त्याचाही तपास करण्याची नागरिकांची मागणी आहे. दागिने हिसकवण्यासह, हातचलाखीने ज्येष्ठांचे दागिने चोरण्याच्याही प्रकाराचा तपास पोलिस लावू शकलेले नाहीत. बसस्थानकावर अनेकदा पोलिस केबिनमध्ये बसून राहतात, गर्दीच्या वेळेस पोलिस स्थानकावरच नसतात, शहरात पोलिसांची दिवसा गस्त गरजेची असताना तशी गस्त होत नाही, संशयास्पद वाहनांची अचानक तपासणी केली जात नाही, बातमीदारांचे मजबूत जाळे आवश्यक आहे पण अनेकदा पोलिसांना बंदोबस्त व इतर कामातून सवडच होत नसल्याचे सांगितले जाते.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यानिहाय गेल्या सहा महिन्यात चोरीच्या घडलेल्या घटना, त्याचा तपास, गेलेला माल या बाबत सविस्तर माहिती देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

चोरीची पुन्हा घटना.....

शहरातील बसस्थानकावरुन महिलेच्या बॅगमधील सोन्याचे गंठण व अष्टमणी असा 34 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी शोभा दत्तात्रय साबळे (रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. 20) दुपारी चार वाजता बसमध्ये बसताना हातातील पिशवीतील दागिने चोरटयांनी हातचलाखीने लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com