धक्कादायक, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फिरतायेत गावभर मोकाट...हा आहे फंडा

जनार्दन दांडगे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पूर्व हवेलीसह पुणे शहरातील विविध खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत कोविडची तपासणी करा, पॉझिटिव्ह आलात तरी निर्धास्त रहा, गावात फिरा...हा फंडा पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विदारक चित्र मागिल काही दिवसांपासून दिसून येत आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीसह पुणे शहरातील विविध खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत कोविडची तपासणी करा, पॉझिटिव्ह आलात तरी निर्धास्त रहा, गावात फिरा...हा फंडा पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विदारक चित्र मागिल काही दिवसांपासून दिसून येत आहे. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

थोडीशी रक्कम मोजून खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतील कोरोनाबाधित रुग्णांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाहीत. पर्यायाने स्थनिक ग्रामपंचायत प्रशासनालाही समजत नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह असो किंवा नसो, सगळेच आळीमिळी गुपचिळी...याचाच गैरफायदा हवेलीकरांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. मग काय पॉझिटिव्ह असूनही अनेक जण गावात, मित्रात बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतील कोरोनाबाधित रुग्णांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्याची सक्ती करण्याची गरज आहे.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी 

उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील बहुसंख्य ग्रामपंचायती व ग्रामपंचायत हद्दीतील बहुसंख्य नागरिक सधन प्रकारात मोडतात. खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीतील कोरोनाबाधितांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाहीत. पर्यायाने ग्रामपंचायत प्रशासनालाही समजत नाही. त्यामुळे पूर्व हवेलीमधील नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आपले नाव कुठेही लिक होऊ नये, यासाठी तीस टक्क्यांहून अधिक सधन नागरिक पूर्व हवेलीसह शहराच्या पूर्व भागातील विविध खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत कोविडची तपासणी करतात. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोविड तपासणीसाठी अडीच हजार खर्च येतो व हा खर्च करणे, ही बाब हवेलीकरांच्या डाव्या हाताचा मळ आहे. कोविड तसासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी कोरोनाबाधित असल्याचा कोणाला संशय येऊ नये, यासाठी अनेक जण बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. तर, सरकारच्या कोविड केअर सेंटरमधून स्वॅब तपासणी केल्यास कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची नावे शासकीय पातळीवर निष्पन्न होतात व त्यांच्या योग्य ते उपचारही होतात. मात्र, खासगी खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची नावे समजत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी अथवा होम क्वारंटाइन केले जात नाही. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेले क्वारंटाइन न होणे, हीच बाब पूर्व हवेलीत कोरोनावाढीचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत कोविडची तपासणी केलेल्या रुग्णांची नावे मिळावीत, अशी मागणी हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने करूनही खासगी रुग्णालये दुर्लक्ष करत आहेत. हीच बाब हवेलीकरांना संकटात नेणारी ठरणार आहे. 

याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव म्हणाले की, खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोनाबाधइत रुग्णांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्रांत वेळेवर पोचत नाहीत. पर्यायाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार करता येत नाहीत. खाजगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत कोविडची चाचणी करणे काही गैर नाही. मात्र, खासगी रुग्णालय व प्रयोगशाळांनी अशा रुग्णांच्या रिपोर्टची माहिती संबधित रुग्ण राहत असेल्या ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याची गरज आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असूनही, बिनधास्तपणे फिरणाऱ्यावर वचक बसणार आहे. 

याबाबत हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले की, खासगी रुग्णालयाच्या मध्यस्थीने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची नावे प्राथमिक आरोग्य केद्रांत वेळेवर पोचत नसल्याने अनेक गंभीर समस्या उभ्या राहत आहेत. खासगी प्रयोगशाळेत झालेल्या कोरोना चाचण्यांची माहिती रुग्णांच्या आधार कार्डवरील पत्यानुसार मिळावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केलेली आहे. मात्र, अद्यापही खासगी प्रयोगशाळा विलंब करत आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयानेच लक्ष घालण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased risk of corona disease in Haveli taluka