अवयवदानाची चळवळ "अनलॉक'च रुग्णांचे प्राण वाचविण्याबाबत वाढतेय जागृती 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

पुण्याने राज्यात आघाडी घेतली. या वर्षी कोरोना उद्रेक असूनही राज्यात 66 जणांनी अवयदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवले. त्यात सर्वाधिक जीव वाचविण्यात पुण्याने योगदान दिल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे -लॉकडाउननंतर अवयवदानाची चळवळ "अनलॉक' करण्यात पुण्याने राज्यात आघाडी घेतली. या वर्षी कोरोना उद्रेक असूनही राज्यात 66 जणांनी अवयदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवले. त्यात सर्वाधिक जीव वाचविण्यात पुण्याने योगदान दिल्याची माहिती पुढे आली आहे. 

अवयवदानाबाबत राज्यात जागृती वाढत आहे. राज्यातील प्रत्येक भागातून मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज भरली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर यंदा कोरोनाचा उद्रेक राज्यात सुरू झाला. त्याचा थेट फटका अवयवदानाच्या चळवळीलाही बसला. या काळात अवयवदानाचे प्रमाण राज्यात कमी झाले. मेंदूचे कार्य थांबलेल्या रुग्णाचे नातेवाईक अवयवदानाला परवानगी देतात. गेल्या वर्षी 160 जणांनी मरणोत्तर अवयवदान केले होते. यंदा कोरोनाच्या उद्रेकात अत्यंत प्रतिकूल अवस्था असतानाही अवयवदानाची चळवळ सुरू ठेवण्यात राज्यातील "झोनल ट्रान्सप्लांटट को-ऑर्डिनेशन कमिटी'ने (झेडटीसीसी) मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे या वर्षी राज्यात 66 जणांनी मरणोत्तर अवयवदान करून, अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवले. 

Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबलेले असल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाने जाहीर केल्यानंतर अवयव दान करता येते. त्याचा निर्णय मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी घ्यायचा असतो. त्यात मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली आहे किंवा नाही, या पेक्षाही नातेवाइकांची अवयव दानास सहमती जास्त महत्त्वाची असते. गेल्या पाच वर्षांमध्ये नातेवाईक अवयव दानाकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागले आहेत. आपली जवळची व्यक्ती हे जग सोडत असताना इतर गरजू रुग्णांना जीवनदान देत असल्याची उदात्त भावना नातेवाइकांनी स्वीकारली आहे. त्यातून हा बदल होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय समाज सेवकांनी व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या बाबत पुण्याच्या "झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, ""मरणोत्तर अवयव दान करण्याचे प्रमाण पुण्यात सातत्याने वाढत आहे. त्यातून वेगवेगळ्या अवयवांच्या प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना अवयव मिळत आहेत.'' 

पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 'कोम्बिंग ऑपरेशन'द्वारे ५५ जणांना अटक

राज्यातील अवयवदान - 66 
पुणे ...... 34 
मुंबई ...... 30 
नागपूर ..... 2 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing awareness about saving the lives of patients Organ donation movement unlock