राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा; मंत्री दत्ता भरणेंना सर्वांत मोठा धक्का

harshvardhan patil bhigvan election
harshvardhan patil bhigvan election

भिगवण - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. भिगवण ग्रामपंचायतीत संत्तांतर झालं असून निवडणुकीत दिवंगत रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला. ग्रामपंचायतीतील 17 जागांपैकी 16 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मागील पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने येथील ग्रामपंचायतीमध्ये मांडलेला संगीत खुर्चींचा खेळ त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसून आले आहे. येथील निवडणूक ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती त्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.

ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व विरोधी सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनेल यांचेमध्ये थेट लढत होती. नऊ अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात होते. आधी चुरशीची वाटणाऱी ही निवडणूक श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने एकतर्फीच जिंकली. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला विक्रमी विकास कामांचा दावा मतदारांनी मात्र नाकारल्याचे दिसून आले. 

प्रभाग क्रमांक एकमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सत्यवान अशोक भोसले, दिपिका तुषार क्षीरसागर हे दोघे निवडुन आले आहेत तर या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणित भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या निलिमा सचिन बोगावत या एकमेव उमेदवार निवडुन आल्या आहेत. उर्वरीत सर्व प्रभागांमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना खाते उघडण्याचीही संधी दिली नाही. 

प्रभाग क्रमांक दोनमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले येथे श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांच्या पत्नी प्रतिमा संजय देहाडे, स्वाती दत्तात्रय धवडे व अमितकुमार बबन वाघ निवडुन आले आहे. 

प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन जागांपैकी दोन्ही जागा जिंकत विरोधकांना चीत केले. या ठिकाणी श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलेच तानाजी अनिल वायसे व माजी उपसरपंच जयदीप जाधव यांच्या पत्नी स्मिता जयदीप जाधव विजयी झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक चारची निवडणुक विरोधकांकडुन प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या ठिकाणी श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलकडुन पॅनेल प्रमुख पराग रमेशराव जाधव निवडणुक रिंगणात होते. येथे पॅनेल प्रमुखांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडुन करण्यात आला होता परंतु विरोधकांचे चक्रव्युह भेदत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने याही प्रभागांमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवत सर्व तिन्ही जागा जिंकल्या. येथे श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे पराग रमेशराव जाधव, गुराप्पा गंगाराम पवार व मुमताज जावेद शेख विजयी झाले. या प्रभागांमध्ये माजी सरपंच व पॅनेल प्रमुख पराग जाधव विक्रमी ४१७ मतांनी विजयी होत विरोधकांना धक्का दिला.

भिगवण स्टेशन येथील प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहामधील सर्व सहा जागा जिंकत विरोधकांचा भुईसपाट केले. येथे प्रभाग क्रमांक पाचमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सईबाई मच्छिंद्र खडके, तुकाराम रामचंद्र काळे व तस्लीम जमीर शेख विजयी झाले तर प्रभाग क्रमांक सहामध्ये कपील माधव भाकरे, शितल बाबासाहेब शिंदे व हरिश्चंद्र गोविंद पांढरे विजयी झाले आहेत.

ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मागील पाच वर्षामध्ये सहा सरपंच व पाच उपसरपंच दिले होते. ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या या संगीत खुर्चीला नाकारत विरोधी दिवंगत रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलकडे सत्ता दिली. विरोधी पॅनेलमधील केवळ राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा खजिनदार सचिन बोगावत यांच्या पत्नी निलिमा सचिन बोगावत या प्रभाग क्रमांक एकमधुन विजयी झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचा झालेल्या दारुन पराभव हा राष्ट्रवादीच्या स्थानिक व तालुकास्तरीय नेत्यांना आत्मचिंतन करावयास लावणारा आहे.

भिगवणमध्ये जनशक्ती व लोकशाहीचा विजय - अशोक शिंदे 
हुकुमशाही पध्दतीने कारभार चालु होता गोरगरीब जनतेवर विरोधकांनी अन्याय केला त्याची चीड लोकांमध्ये होती. जनतेने मतपेटीच्या माध्यमातून विरोधकांची हुकुमशाही व मनमानी कारभार नाकारला असून श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलच्या सर्वधर्म समभाव व लोकशाहीवादी कारभारावर विश्वास व्यक्त केला आहे. दिवंगत रमेशबापु यांनी भिगवणच्या विकासांमध्ये दिलेल्या योगदानास मतदारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हा राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सर्व प्रमुख व कार्यकर्यांचा यांचा विजय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com