इंदापूर नगरपरिषदेचा 'आरोग्य आपल्या दारी' उपक्रम; घरोघरी जाऊन केली जातेय आरोग्य तपासणी!

Indapur_Municipal_Council
Indapur_Municipal_Council

इंदापूर : इंदापूर नगरपरिषद आणि पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने 'आरोग्य आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत शहरात कोरोना सर्व्हेक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 23 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सापडलेल्या १५ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यापैकी फक्त ९ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळले. त्यांचे विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोरोना प्रतिबंध तसेच त्यावर मात करण्यासाठी नगरपरिषद कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर तसेच शिक्षकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्षा अंकिता शहा, जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी चालू सर्वेक्षणाचा आढावा घेतला.

पहिल्या टप्प्यात इंदापूर नगर परिषदेमार्फत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी ऑक्सिमीटर, पल्स मीटर आणि थर्मामीटरच्या सहाय्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करत जेष्ठ नागरिक, त्यांचे आजार तसेच इतर नागरिकांचे आजार याची वर्गवारी केली. यावेळी अंकिता पाटील यांनी ठाकर गल्लीत स्वतः ज्येष्ठ महिलांची पल्स मीटर, ऑक्सिमीटरने तपासणी केली. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, शहरात दुसऱ्या टप्प्यात आणखी 8 हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

अंकिता पाटील म्हणाल्या, कोरोना ही जागतिक महामारी आहे, त्यामुळे ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील, त्यांनी ताबडतोब उपचार घेतल्यास ते आणि त्यांचे कुटुंब, मित्र परिवार कोरोना मुक्त राहून मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. दरम्यान जनता कर्फ्यूस दुसऱ्या दिवशी इंदापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इंदापूर शहरात सुरू असलेल्या नियोजनबद्ध आरोग्य तपासणी, संशयित रुग्ण, कोरोनाबाधीत रुग्ण, त्यांच्यावरील उपचार तसेच त्यांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी आणि त्यांचे विलगीकरण या पंचसूत्रीमुळे कोरोनावर मात करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना सर्वेक्षण करताना इंदापूर नगर परिषदेच्या नियोजनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा, या शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नगराध्यक्षा शहा, मुख्याधिकारी डॉ. ठेंगल आणि सहकारी नगरसेवक, कर्मचारी, शिक्षक यांच्या कार्याचे कौतुक केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com