कच-यापासून खत निर्मितीचा इंदापूर नगरपरिषदेचा उपक्रम

डॉ. संदेश शहा
बुधवार, 20 जून 2018

इंदापूर- इंदापूर नगरपरिषदेने येथील हिंदू वैकुंठ स्मशानभुमीत ओल्या कच-यापासून तयार केलेल्या सेंद्रिय खताची विक्री सुरु केली आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर, नगरपरिषद विरोधी पक्षनेता पोपट शिंदे तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जावेद शेख यांच्या हस्ते पाच रूपये एवढ्या अल्प दरामध्ये 25 किलोची एक बॅग अश्या 40 पिशव्यांमधील एक टन सेंद्रिय खताची विक्री माळवाडी नं. एकचे शेतकरी सतीश व्यवहारे आणि दत्तु व्यवहारे यांना केली. 

इंदापूर- इंदापूर नगरपरिषदेने येथील हिंदू वैकुंठ स्मशानभुमीत ओल्या कच-यापासून तयार केलेल्या सेंद्रिय खताची विक्री सुरु केली आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर, नगरपरिषद विरोधी पक्षनेता पोपट शिंदे तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जावेद शेख यांच्या हस्ते पाच रूपये एवढ्या अल्प दरामध्ये 25 किलोची एक बॅग अश्या 40 पिशव्यांमधील एक टन सेंद्रिय खताची विक्री माळवाडी नं. एकचे शेतकरी सतीश व्यवहारे आणि दत्तु व्यवहारे यांना केली. 

नगरपरिषदेने सध्या दहा टन सेंद्रीय खत तयार केले असून, ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, काँग्रेस गटनेते कैलास कदम, विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, गटनेता गजानन गवळी तसेच नगरसेवकांनी स्वच्छ, सुंदर व हरित इंदापूर साठी तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून  दुर्गंधी  मुक्त कचरा डेपो करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ओला व सुका कचरागोळा करण्यासाठी दोन स्वतंत्र घंटागाडी सुरू केल्या. तसेच सेंद्रीय खत निर्मितीसाठी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्मजीव शास्त्र विभागाशी जैविक जिवाणू संदर्भात करार केला. त्यानुसार ज्योतीबाच्या माळालगत कचरा डेपोमध्ये कच-यापासून खत निर्मिती करण्याचा सर्वप्रथम यशस्वी प्रयोग झाल्याने हा परिसर दुर्गंधीमुक्त झाला. त्यानंतर नगरपरिषदेने हा उपक्रम संत गाडगेबाबा चौकालगत वैकुंठ स्मशानभुमीत राबविला. 

येथे जैविक जिवाणूंची फवारणी, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी बेडवर करण्यात आली. तयार झालेल्या खताचे परीक्षण पुणे येथील कृषी विद्यापीठाच्या 
प्रयोगशाळेत तसेच मिटकॉन कंपनीकडून करण्यात आले. त्यांनी या खताचा दर्जा उत्तम असून उच्च प्रतीचे खनिजद्रव्य असल्याचे नमुद केल्यानंतर या खताची विक्री करण्यात आली. सचिव मुकूंद शहा म्हणाले, राज्यात अनेक भागात कच-याची समस्या असून त्यातून अनेक आंदोलन झाली. कचरा हे सोनं असून, त्यापासून उच्च दर्जाचे सेंद्रिय खत निर्मिती होवू शकते हे आम्ही सिध्द केले आहे. याचा वापर शेतकरी व नागरिकांनी फळबाग,परसबागेसाठी करणे गरजेचे आहे. कच-यापासून सेंद्रीय खत निर्मितीसाठी जैवीक जिवाणूंचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न असून राज्यात कच-यापासून खत निर्मितीसाठी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले, सेंद्रिय खत प्रकल्पामुळे शासन स्तरावरील हरित ब्रँन्ड इंदापूर नगरपरिषदेस मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उच्च प्रतीचा प्लास्टिक मुक्त ओला कचरा देण्याचे आवाहन त्यांनी केले. अशोक चिंचकर, लिलाचंद पोळ, सुनिल लोहिरे व गोविंद जाधव या नगरपरिषद कर्मचा-यांनी खत प्रकल्पास मदत केल्याने त्यांचा सत्कार झाला. यावेळी सागर गानबोटे, प्रमोद राऊत, अल्ताप पठाण उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Municipality's initiative of fertilizer production from Trash