इंदापूर तालुक्यावर वरुणराजाची दुप्पट कृपा 

राजकुमार थोरात
Wednesday, 9 September 2020

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाळ्याच्या सुरवातीला तालुक्यामध्ये कमी पाऊस पडत होता. जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जोपासलेली पिके अनेक वेळा पावसाअभावी पावसाळ्यात जळून गेली आहेत.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याला चालू वर्षी पावसाने झोडपले असून, आजअखेर तालुक्यामध्ये गतवर्षी झालेल्या पावसाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाळ्याच्या सुरवातीला तालुक्यामध्ये कमी पाऊस पडत होता. जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जोपासलेली पिके अनेक वेळा पावसाअभावी पावसाळ्यात जळून गेली आहेत. पावसाळ्याच्या सुरवातीपेक्षा परतीच्या पावसावर शेतकऱ्यांचा भरवसा असायचा. मात्र, चालू वर्षी जून महिन्यापासून तालुक्यामध्ये जोराचा पाऊस सुरु झाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अंथुर्णे, भरणेवाडी परिसरामध्ये आजअखेर गतवर्षीच्या पावसाच्या तुलनेत तिप्पटीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर, इतर ठिकाणी दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पावसाच्या दरवर्षी प्रमाणे अंदाजावर केलेल्या पीक लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

जूनपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांचे शेवग्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेले मका पीक पाणी साचल्याने वाया गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची उसाची लागवड खोळंबली आहे. शेतकरी शेताला वापसा येण्‍याच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. 
 
9 सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस व कंसात गतवर्षीचा पाऊस (मि.मी.मध्ये) 
सणसर 511 (213), अंथुर्णे 379 (156), निमगाव केतकी 569 (213), बावडा 383 (142). 

पावसाळ्याच्या सुरवातीला पाऊस कमी पडत असे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्याचे पाणी बाजरी, मका व ऊस पिकांना वेळेमध्ये मिळण्यासाठी जून, जुलैमध्ये आंदोलन करावे लागले होते. मात्र, चालू वर्षी सुरवातीपासून चांगला पाऊस पडला. त्यामुळे बाजरी व मका पीक जोमात आले आहे. 
- पोपट कारंडे, शेतकरी, निमसाखर (ता. इंदापूर) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur taluka receives twice as much rainfall as last year