इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये सहा दरोडेखोरांचा धुमाकूळ| Thief | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thief

इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये सहा दरोडेखोरांचा धुमाकूळ

वालचंदनगर : इंदापूर (Indapur) तालुक्याच्या पश्‍चिम भागातील रत्नपुरी व अंथुर्णे परीसरामध्ये सहा दरोडेखोऱ्यांनी धुमाकुळ घातला. दोन ठिकाणी दरोडे टाकून एक लाख ५६ हजार रुपयांच्या रोख रक्कम सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवजसह ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांचा प्रतिकार करीत असताना कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड जखमी झाले.

सोमवार (ता.२७) रोजी पहाटे दोन च्या सुमारास रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या घरामध्ये सहा दरोडेखोऱ्यांनी घराचा दरवाजा कटावणीच्या साहय्याने तोडून प्रवेश केला. यावेळी गायकवाड त्यांच्या पत्नी सुनंदा, भाऊ राहुल, भावजय वैशाली व सुन प्रियांका यांच्यासह घरामध्ये लहान मुले होती. चोरट्यांनी राजेंद्र गायकवाड यांच्या बेडरुम प्रवेश करुन त्यांची पत्नी सुनंदा यांना चाकूचा धाक दाखवून कपाटील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले.

हेही वाचा: पुणे : पादचारी मार्गावरची गाडी उचला अन्यथा नोंदणी रद्द

हातातील सोन्याच्या बांगड्या निघत नसल्याने चोरट्यांनी पकडीने कापल्या. तुम्हा सर्व दागिने दिले असून आम्हाला त्रास देवू नका असे मोठ्या आवाजाने सांगत असताना अचानक राजेंद्र गायकवाड यांना जाग आली. चोरट्यांनी त्यांना सुरवातीला लाकडी काठीने मारहाण केली. गायकवाड यांनी प्रतिकार करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांच्या कपाळावर चाकुने वार केला. राजेंद्र गायकवाड व सुनंदा गायकवाड यांनी घरामध्ये काेंडून वरच्या मजल्यावरती चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव होता. मात्र गायकवाड यांनी दरवाजा ओढून धरला. चोरटे वरच्या मजल्यावर जात असताना राहुल गायकवाड व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी वरुन पाण्याची स्टीलची बाटली फेकुन मारुन बंदुक आणा...बंदुक असा आवाज दिल्याने चाेरट्यांनी दीड लाख रुपये रोख रक्कम व सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज घेवून पळ काढला.

जाताना गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली. याप्रकरणी सुनंदा गायकवाड यांनी दरोड्याची फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या घरावरील दरोड्यांनतर चोरट्यांनी अंथुर्णे गावाजवळील वाघवस्तीकडे मोर्चा वळवून जगन्नाथ मल्हारी वाघ यांच्या घराचे कटावणीने कुलूप तोडून घरातील सहा हजार रुपये राेख रक्कम व सव्वादोन तोळे सोन्याचे दागिने, एक घड्याळ असा

हेही वाचा: इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे

१ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी जगन्नाथ वाघ यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तातडीने भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

दरोडेखोरांचे धाडस..

राजेंद्र गायकवाड यांच्या घरामध्ये चोरटी घुसल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करुन दरोड्याची माहिती दिली.पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.गायकवाड यांच्या घरी पोलिस असतानाच शेजारी सुमारे दोन कि.मी अंतरावर दरोडेखाेर वाघ यांच्या घरामध्ये चोरी करीत होते.

टॅग्स :Pune Newscrimethief