इंदापूरचे आवर्तन लटकले

इंदापूरचे आवर्तन लटकले

शेटफळगढे - इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी २० सप्टेंबरपासून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन संपूर्ण सिंचन होईपर्यंत म्हणजे सुमारे २० दिवस चालणार होते. पण, आज पुण्यात मुठा कालवा फुटल्याने हे आवर्तन तातडीने बंद करण्यात आले, त्यामुळे तालुक्‍यात पुन्हा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

खडकवासला कालव्याचे चालू आवर्तन बंद करून ते बारामती तालुक्‍यातील जनाई-शिरसाई योजनेसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर पाण्यावरून तालुक्‍यात मोठे राजकीय वादंग झाले होते. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शेतकऱ्यांसह सिंचन भवनात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला होता. या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. या शिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही निवेदन देत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यात त्यांनी आमच्यामुळे पाणी सुटल्याचा दावा करून भरणे यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत टीका केली होती. त्यानंतर तालुक्‍यात राजकीय कलगीतुरा रंगला होता. आवर्तन सुटल्यानंतर तालुक्‍यात सुरळीतपणे सिंचनाचे काम सुरू होते. पण, पुण्यात आज सकाळी मुठा कालव्याला भगदाड पडले आणि जनता वसाहत आणि परिसरातील रस्त्यावर पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून आवर्तन तातडीने बंद करण्यात आले आणि इंदापूरचे आवर्तन पुन्हा एकदा थांबले. जलसंपदा विभागाकडून आजच कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ते तातडीने पूर्णही करण्यात येईल, पण लागलीच पाणी सोडता येणार नाही; कारण संबंधित भाग कोरडा होऊ द्यावा लागणार आहे. त्यातच उद्या होणारी कालवा सल्लागार समितीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूरच्या आवर्तनाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. कारण, तालुक्‍यात टंचाईसदृश परिस्थिती असून अनेक ठिकाणाहून पाण्याची मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com