Independence Day Special : स्वातंत्र्याने काय दिले

Independence-Day-Special
Independence-Day-Special

स्वातंत्र्य आपण लढून मिळवले असले तरी आपल्या संस्कार, संस्कृती, इतिहासात त्याची बीजं आढळतात. ते मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, लढा दिला, त्याच्या ऋणात राहण्याची भावना आजच्या पिढीत आहे. त्याबरोबर त्याची जाण ठेवून वाटचालीची ग्वाहीही ही पिढी देते आहे...

स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
स्वातंत्र्य हेच आपले सर्वस्व आहे. कारण त्याने आपल्याला अस्तित्व दिले. वैचारिक मतभेद असले तरी सामाजिक समानता स्वातंत्र्याने दिली. सहजीवनाचा आनंद दिला. आचार-विचार-भ्रमण यांचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या मूल्यांना अवकाश दिले. म्हणून आज आपण प्रगती करू शकतो. आपले आयुष्य स्वातंत्र्यानेच व्यापलेले आहे. हुकूमशाही राष्ट्रांचा विचार केला, तर आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ काय हे समजते. स्वातंत्र्य म्हणजे जीवनच आहे.
- डॉ. नितीन करमळकर, (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

सर्वांना साष्टांग नमस्कार
स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वत: घेण्याची मुभा. हा अधिकार सर्वांना स्वातंत्र्यानेच दिला आहे; परंतु या स्वातंत्र्याबरोबर स्वत:च्या चांगल्या किंवा वाईट निर्णयाची जबाबदारी पदरी पडते. लहान असताना आपल्यासाठी काय वाईट किंवा काय योग्य, हे पालकच ठरवितात. आपल्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय खूप सुरेख फळ देतात, तेव्हा आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहतो. त्याचप्रमाणे देवदयेने मी स्वतंत्र भारतात जन्माला आलो. पारतंत्र्य म्हणजे काय, याचा वाईट अनुभव ज्या लोकांना मला भोगावा लागला नाही, त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त माझा साष्टांग नमस्कार.
- पं. संजीव अभ्यंकर, शास्त्रीय गायक

स्वातंत्र्य आपल्या डीएनएमध्येच
लहानपणापासून माझे भावविश्‍व जसे उलगडत गेले, तसे मला स्वातंत्र्याचा आपल्यावरील प्रभाव समजू लागला. या स्वातंत्र्यामुळे विचारांमध्ये प्रगल्भता आली. विचारांच्या दिशा निश्‍चित करता आल्या. माणसांना भेटताना, फिरताना त्यांच्या वेदना पाहायला मिळाल्या. स्वातंत्र्याचाच हा परिपाक आहे. आपले हे स्वातंत्र्य कुणाचा उपकार नाही, तर ते आपल्या डीएनएमध्ये आहे, आपल्या बंडखोरीत आहे. हजारो वर्षांपूवीचे ऋषी, मुनी आणि आपली बंडखोरी याबाबतीत वेळोवेळी घडलेल्या घटना याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वातंत्र्य आहे.
- संजय नहार, संस्थापक, सरहद, पुणे

स्वातंत्र्य खूप मोठे संचित
लहानपणापासून मोठे असताना संविधानातील जी मूल्ये आहेत, मग ती सामाजिक न्याय वा बंधुता असो, त्यामुळे समाजातील एकोपा आणि त्याची आपल्यातील जाणीव स्वातंत्र्यामुळे दृढ झाली. तसेच आर्थिक न्यायाची आणि लोकशाही मूल्ये यामुळे जगाविषयीचा व्यापक दृष्टिकोन तयार झाला. परोपकार, संवेदना आणि सर्वांप्रती आदर, समानता याचे व्यापक रूप म्हणजे स्वातंत्र्य आहे. त्यातूनच आपली हजारो वर्षांची संस्कृती आणि मूल्ये ही अधिक भक्कम झाली. स्वातंत्र्य हे आपल्याला दिलेले हे खूप मोठे संचित आहे. प्रत्येकाला स्वत:च्या संस्कृतीनुसार जगण्याचा अधिकार 
स्वातंत्र्याने दिला आहे. 
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र

जवानांमुळे स्वातंत्र्य अबाधित
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जे हौतात्म्य पत्करले, ते विसरून चालणार नाही. त्यांच्या त्यागामुळे आज आपण हा दिवस पाहू शकतो. आज आपण देशात सुरक्षित राहू शकतो, आपले स्वातंत्र्य अबाधित आहे, याचे श्रेय सीमेवर असणाऱ्या जवानांचे आहे. 
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री

स्वातंत्र्यदिनाचा अविस्मरणीय अनुभव
एका मालिकेत १५ ऑगस्टनिमित्त सर्व वीरपत्नींचा सत्कार केला होता. त्या दरम्यान काही पत्रकार उपस्थित होते आणि त्यांनी मला त्या वीरपत्नींची मुलाखत घ्यायला सांगितली, त्यामुळे मला खूपच दडपण आलं होतं. त्या मला बोलल्या, की आम्ही तुमच्या मालिकेला खूप रिलेट करतो. आम्ही जे क्षण अनुभवले ते आम्हाला मालिकेतून डोळ्यांसमोर येतात, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी.
- शिवानी बावकर, अभिनेत्री
(शब्दांकन - संतोष शाळीग्राम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com