नक्षलग्रस्त भागात ‘कल्याणी एम-४’ची उपयुक्तता

भारत फोर्ज निर्मित वाहनाद्वारे भूसुरुंगांचा सामना सक्षमपणे करणे शक्य
india forge Kalyani M-4 vehicle Naxal affected areas security
india forge Kalyani M-4 vehicle Naxal affected areas securitysakal

पुणे : भारत फोर्ज लिमिटेडद्वारे भारतीय लष्करासाठी अत्याधुनिक ‘कल्याणी एम-४’ वाहनाची निर्मिती करण्यात आली असून हे वाहन सर्व प्रकारच्या स्फोटकांचा, भूसुरूंगांचा सामना करण्यास सक्षम आहे. यामुळे जीवितहानी टाळली जाऊ शकते. दरम्यान या वाहनाचा वापर नक्षलग्रस्त क्षेत्रातही केला जाऊ शकतो. याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात कारवाईदरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पोलिस दलातील जवानांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सातत्याने निर्माण होत असतो. सुरक्षा दलाच्या नियमित गस्तीचे मार्ग, शिबिर आदी ठिकाणांची माहिती नक्षलवादी स्थानिकांवर दबाव टाकत गोळा करतात. त्याआधारे सुरक्षा दलांच्या वाहनांची माहिती घेऊन नक्षलवादी भूसुरुंगाची ठिकठिकाणी पेरणी करतात.

त्यामुळे नक्षली हल्ल्यांचा समर्थपणे सामना करण्यास सुरक्षा दलांना अपयश येते. परिणामी जीवितहानी होते. दरम्यान अशा प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागात गस्त, पाळत ठेवणे तसेच सुरक्षित प्रवासासाठी स्वदेशी बनावटीच्या बुलेटप्रूफ ‘कल्याणी एम-४’ या वाहनाचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असे बाबा कल्याणी यांनी सांगितले. स्वदेशी बनावटीच्या केएम-४ (कल्याणी एम-४) या वाहनाच्या निर्मितीसाठी बॉडी व भागांची सर्व कामे मुंढवा येथील प्रकल्पात तर वाहनाची असेंब्लीचे संपूर्ण काम हे लोणी काळभोर येथील प्रकल्पात केले जाते. या वाहनाच्या देखभालीची जबाबदारी भारत फोर्जद्वारे पार पाडली जाणार असल्याचे भारत फोर्जचे उपव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले.

भविष्यात निर्यातीला प्राधान्य

सध्या आम्ही भारतीय लष्कराला केंद्रस्थानी ठेऊन वाहनांची निर्मिती करत आहोत. लष्कराच्या गरजेनुसार वाहनांचे उत्पादन करण्यावर भर दिला जात आहे. या वाहनाची वैशिष्टय पाहता इतर देशांकडून मागणी आल्यास या वाहनांच्या निर्यातीला ही प्राधान्य दिले जाऊ शकते, असेही बाबा कल्याणी यांनी नमूद केले.

या आहेत समस्या

  • नक्षलग्रस्त क्षेत्रात छुपे हल्ले

  • भूसुरुंग निकामी करण्याचे काम अवघड

  • भूसुरुंग हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी

  • अत्याधुनिक बुलेटप्रूफ वाहनांची कमतरता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com