

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : ‘‘दहशतवादाचा पराभव करण्यासाठी भारत आवश्यक ती सर्व कारवाई करत राहील”, असा सज्जड इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात असलेल्या सहा दहशतवाद्यांविरुद्ध त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा इशारा दिला आहे.
दहशतवादाचे गांभीर्य आंतरराष्ट्रीय समुदायाने ओळखावे आणि त्याविरोधातील जागतिक कारवाई अधिक मजबूत व्हावी, अशी भारताची भूमिका असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्याबद्दल रणधीर जयस्वाल म्हणाले, की अशा दहशतवादी कारवायांचे गांभीर्य संपूर्ण जगाने समजून घ्यावे, अशी भारताची इच्छा आहे. भारताला दहशतवादाची मोठी झळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाविरोधातील लढा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी कारवाईसाठी भारताने प्रयत्न केले आहेत. हा लढा पुढेही सुरू राहील. दहशतवादाचा पराभव करण्यासाठी आवश्यक ती कोणतीही कारवाई करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
२६/११ हल्ल्याप्रकरणी लश्करे तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद, झकी-उर-रहमान लखवी, साजिद मीर, अबू अलकामा, असीम ऊर्फ अबू काहाफा आणि मेजर अब्दुर रहमान पाशा या सहा पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी सोमवारी अनुपस्थितीत खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आरोपींना ताब्यात देण्याची भारताने सातत्याने मागणी करूनही पाकिस्तानकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने भारताने आता उपलब्ध कायदेशीर मार्गांचा वापर सुरू केला आहे. ;
भट्टीबाबतच्या दाव्यावर ठाम
दरम्यान, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडून भारताचे आरोप फेटाळले जात असल्याबाबतही जयस्वाल यांनी पाकिस्तानवर खरमरीत टिप्पणी केली आणि पाकिस्तानस्थित शहजाद भट्टीच्या दहशतवादी नेटवर्कचा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी (आयएसआय) संबंध असल्याचा भारताचा आरोप त्यांनी पुन्हा अधोरेखित केला. ते म्हणाले, ‘‘भारत सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यावरच सरकार ठाम आहे.’’
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सोमवारी १४ राज्यांमध्ये समन्वित कारवाई करून पाकिस्तानस्थित शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर कारवाई केली होती. हे नेटवर्क आयएसआयच्या पाठिंब्याने कार्यरत असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. घातपाती कारवायांचे कथित मनसुबे हाणून पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.