विदेश संक्षिप्त

विदेश संक्षिप्त
Published on

*आशिया
व्यापारासाठी चर्चा
लिमा : व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताबरोबर मुक्त व्यापार करार करणार असून त्याबाबतच्या चर्चेचा पुढील टप्पा जून महिन्यात होणार असल्याचे पेरूचे भारतातील राजदूत झेवियर पॉलिनिशय यांनी सोमवारी सांगितले. हा करार या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रत्यक्षात येण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. पेरू हा तांबे उत्पादनात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून दुर्मीळ खनिजांबाबतही भारताशी बोलणी सुरू आहेत.

विमानाने घेतला पेट
काठमांडू : तुर्किश एअरलाइन्स या कंपनीच्या एका विमानाने आज त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर उतरताना अचानक पेट घेतला. प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढल्याने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून विमानतळ काही काळासाठी बंद ठेवावा लागला होता. ही घटना घडली त्यावेळी विमानात २७७ प्रवासी होते. हे विमान एअरबस ३३० जेट या प्रकारातील होते.

‘प्रत्युत्तरा’ची स्मृती
इस्लामाबाद : भारताने सात ते दहा मे २०२५ या कालावधीत ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला अद्दल घडविल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या युद्धात पराभव झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलेले नाही. उलट, भारताला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याची स्मृती म्हणून १० मे हा दिवस ‘मकरा ए हक’ (सत्याची लढाई) म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी युद्ध थांबविल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.

शाळेचे भूमिपूजन
काठमांडू : भारताच्या आर्थिक मदतीच्या आधारे उभारल्या जाणाऱ्या सिद्धनाथ माध्यमिक विद्यालयाचे भूमिपूजन आज नेपाळमधील कैलाली जिल्ह्यात पार पडले. भारतीय दूतावासातील प्रधान सचिव नारायण सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारत सरकारने या शाळेसाठी तीन कोटी साठ लाख नेपाळी रुपये एवढी मदत केली आहे.

*युरोप
हस्तांतराबद्दल आभार
लिस्बन : फरार गुन्हेगार अभय राणा याचे भारताकडे यशस्वीपणे हस्तांतर केल्याबद्दल भारत सरकारने पोर्तुगालचे आभार मानले. भारतात गुन्हा करून पळून गेलेल्या गुन्हेगारांना माघारी आणण्याच्या मोहिमेतील एक पाऊल पुढे पडले असल्याचे सरकारने सांगितले. अभय राणा याच्याविरोधात हरियाना खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे. तो फरार झाल्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.

राजदूत पाचारण
लंडन : दोन चिनी व्यक्तींना हेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा झाल्यानंतर ब्रिटन सरकारने येथील चिनी राजदूतांना पाचारण करत या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. संबंधित चिनी नागरिक चीन सरकारसाठी बेकायदा पद्धतीने माहिती गोळा करत असल्याचे आढळन आल्यानंतर त्यांना पकडून न्यायालयात खटला चालविला गेला. यात ते दोषी ठरले. ब्रिटन सरकारला असे प्रकार अमान्य असल्याचे चिनी राजदूतांना सांगण्यात आले.

*आफ्रिका
‘समान पातळीवर’
नैरोबी : एकेकाळी वसाहती स्थापन करून राज्य केलेल्या आफ्रिका खंडाशी असलेल्या संबंधांचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आजपासून केनियाचा दौरा सुरू केला आहे. येथे ते ‘आफ्रिका फॉरवर्ड’ परिषदेत सहभागी होणार आहेत. फ्रान्सने मागील वर्षी पश्‍चिम आफ्रिकेतून आपले सर्व सैन्य मागे घेत येथील आपले वर्चस्व संपुष्टात आणले होते. आफ्रिकेतील देशांबरोबर आता समान पातळीवरून व्यवहार होतील, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com