

अबू धाबी, ता. १५ (पीटीआय) : ‘‘पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीचे(यूएई) अध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान केले.
पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाले. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ‘यूएई’चे अध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नाहयान यांची बैठक झाली. यावेळी ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्य दृढ करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणकडून यूएईमधील अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या लष्करी तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत, ‘‘यूएईवरील हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो,’’ असे मोदी यांनी बैठकीच्या सुरुवातीच्या भाषणात म्हटले.
‘‘यूएईला ज्या प्रकारे लक्ष्य करण्यात आले ते स्वीकारार्ह नाही. सध्याची परिस्थिती यूएईने ज्या संयमाने हाताळली ते कौतुकास्पद आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम जगभर जाणवत असल्याचे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
विविध करारांवर स्वाक्षऱ्या
देशाच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह्ज लिमिटेड’ने अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीसोबत ‘धोरणात्मक सहकार्य’ करार केला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. ऊर्जा सुरक्षा, भारताचे पेट्रोलियम साठे वाढविणे तसेच द्रवस्वरूप नैसर्गिक वायू आणि द्रवस्वरूप पेट्रोलियम वायू साठवण सुविधांमध्ये संभाव्य सहकार्य या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी द्रवरूप पेट्रोलियम वायू क्षेत्रातील ‘धोरणात्मक सहकार्य’ करारावरही स्वाक्षरी केली. भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या वायूचा दीर्घकालीन पुरवठा, आर्थिक स्थैर्य आणि ऊर्जा भागीदारी बळकट करणे हा त्यामागील उद्देश आहे. त्याचप्रमाणे जहाजवाहतूक आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातही करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, शुक्रवारी झालेल्या चर्चेत ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, निळी अर्थव्यवस्था, फिनटेकसह तंत्रज्ञान, संरक्षण आणि जनतेतील संबंध यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा झाली. पश्चिम आशियातील घडामोडी आणि इतर जागतिक प्रश्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
नाहयान यांच्याकडून स्वागत
अल नाहयान यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना मानवंदनाही देण्यात आली. याबद्दल, माध्यमावरील संदेशात पंतप्रधान मोदी यांनी अबूधाबी विमानतळावर स्वागत केल्याबद्दल ‘यूएई’च्या अध्यक्षांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.