भोरमध्ये भारतातील सर्वांत मोठे नागवेलींचे पान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

भोर येथील प्रा. शहाजी लगड यांच्या बागेतील नागवेलीच्या (विड्याच्या) पानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली. लगड यांच्या बागेत नागवेलीच्या मोठ्यात मोठ्या वाढलेल्या पानाची लांबी 30 सेंमी व रुंदी 17 सेंमी आहे. 

भोर (पुणे)  : येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील प्रा. शहाजी लगड यांच्या बागेतील नागवेलीच्या (विड्याच्या) पानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली. लगड यांच्या बागेत नागवेलीच्या मोठ्यात मोठ्या वाढलेल्या पानाची लांबी 30 सेंमी व रुंदी 17 सेंमी आहे. 

प्राध्यापक व योगशिक्षक असलेल्या लगड यांना झाडे लावणे, कलम करणे व झाडांची जोपासना करण्याचा छंद आहे. त्यांनी घराभोवती बागेत व टेरेसवरही झाडांची लागवड केली आहे. आंबा, फणस, नारळ, सफरचंद, कॉफी, चाफा, वेलदोडा, अननस व तमालपत्र अशा प्रकारची झाडे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी चार महिन्यांपूर्वी घराच्या बाजूला नागवेलीच्या (शास्रीय नाव बेटल व्हाइन लीफ) वेलाची लागवड केली आहे. घराच्या भिंतीवर व झाडांवर हा वेल वाढत आहे. त्याच्या पानाची लांबी नियमित पानांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर लगड यांनी त्याचे फोटो व चित्रफीत ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविली. 

लगड हे पती- पत्नी झाडांना व वेलांना फक्त सेंद्रिय खताचाच वापर करतात. रासायनिक खताचा एकही दाना ते झाडांना वापरत नाहीत. इंडिया रेकॉर्डने त्यांच्या नागवेलीच्या पानाची दखल घेऊन खात्री केल्यानंतर "मोठ्यात मोठे वाढलेले विड्याचे पान' अशी नोंद रेकॉर्डमध्ये करण्यात आली. अशा आशयाची माहिती रेकॉर्डकडून ई- मेलद्वारे लगड यांना पाठविण्यात आली आहे. शेणखत जास्त मिळाल्यामुळे नागवेलीची पाने मोठी झाली असल्याचे लगड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's largest nagavelli leaf in bhor