बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांचे कोण लागतात?

बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांचे कोण लागतात?

वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार असल्याचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी जाहीर केले. वाहतूक विभाग प्रथमच इतकी धडक कारवाई करताना जनतेने पाहिला. विशेष म्हणजे दुजाभाव न करता अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या वाहनावरदेखील नियम मोडला म्हणून कारवाई केली. त्यामुळेच या कामाचे कौतुक आहे. पोलिसांचा हाच खाक्‍या कायम राहिला तर लोक नियम मोडण्याचे धाडस करणार नाहीत. या चांगल्या कामासाठी वाहतूक पोलिसांना शुभेच्छा! पण...

मीटरसक्तीचे धाडस दाखवा  
शहरातील सर्व वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे. आज राज्यात एकाही शहरात नाहीत असे प्रशस्त रस्ते पिंपरी-चिंचवडला आहेत. केवळ बेशिस्तीमुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी होते. किरकोळ अपघातांच्याही तक्रारी वाढत आहेत. पदपथ आणि रस्त्यांवरची अतिक्रमणे हा दुसरा विषय आहे. बेशिस्तीमध्ये पहिला क्रमांक लागतो तो रिक्षाचालकांचा. शहरातील सर्व चौकांत रिक्षाचालक रस्ता अडवून तीन-चारच्या रांगेने थांबतात.

चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांच्या समोर सिग्नल तोडून जातात (अन्य प्रवासी थांबलेले असताना). तीन प्रवाशांची परवानगी असताना ‘शेअर-ए-रिक्षा’ नावाखाली मागे पाच पुढे तीन असे तब्बल सात-आठ प्रवासी कोंबून बसवतात. दापोडी ते निगडी, पिंपरी ते भोसरी, चिखली, चिंचवड ते चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा ते भोसरी, काळेवाडी ते पिंपरी कॅंप, थेरगाव ते वाकड अशा किमान पंचवीस मार्गांवरचे हे दृष्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. लोकांना हे दिसते, तेच वाहतूक पोलिसांना का दिसत नाही,त्यामागचे गूढ मात्र समजत नाही. 

बेशिस्त, बेकायदा रिक्षा वाहतुकीवर कारवाई का होत नाही हे कोडे आहे. दरमहा हजार रुपयांची वर्गणी (पावती) असते, असे हे चालक उघडपणे सांगतात. रिक्षाचालकांच्या संघटनाच ‘वर्गणी’ गोळा करून देतात अशीही वदंता आहे. ही मेहेरबानी असल्याने या मंडळींना कुठलाही नियम लागू नाही, असा समज आहे. खरे, खोटे पोलिस जाणोत. मीटर सक्ती आहे, पण एकही चालक मीटर टाकत नाही. कोणी प्रवाशाने विचारले तर उद्धट उत्तर मिळते. वाहतूक पोलिस प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) बोट दाखवतात आणि आरटीओ वाहतूक पोलिसांकडे. गेले वीस वर्षे हाच खेळ सुरू आहे. सामान्य प्रवाशांना कोणीही वाली नाही. आजही बाद झालेल्या पाच हजारांवर शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा पोलिसांच्याच साक्षीने पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर धावतात. वाहतूक पोलिसांना हे माहीत नाही का? रिक्षाचालकांच्या खालोखाल दुचाकीचालकही बेशिस्त आहेत. दोघांची परवानगी असताना तिघे-तिघे गाडीवर बसून जातात. पोलिस बघ्याची भूमिका घेतात. वाहनांना काळ्या काचांची बंदी आहे, पण महापालिकेसमोर शेकडो काळ्या काचावाले पोलिसांच्या नाकावर टिच्चून थाटात उभे असतात. फॅन्सी क्रमांकाचे ‘दादा’, ‘भाई’, ‘नाना’ हजारो राजरोस फिरतात. ‘नो एन्ट्री’चा नियम कोणीच पाळत नाही (पिंपरी कॅंपला भेट द्या...). कारण ‘वर्गणी’, ‘चहापाणी’ यामुळे वाहतूक पोलिसांनाही कोणीच भीक घालत नाही, घाबरत नाही.

‘सीसीटीव्ही’खोटे सांगतात का?
शहरात दोनशेवर सीसीटीव्ही कॅमेरे चौकाचौकात लावलेले आहेत. हेतू कोणीही सिग्नल तोडू नये. वास्तवात तमाम वाहनचालक, जनता सिग्नल तोडते, झेब्रा क्रॉसिंगवर थांबतात, विरुद्ध दिशेने धावतात. पोलिस आणि वॉर्डन उभे असताना त्यांच्या समोरही हेच चालते. अलीकडे मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडणाऱ्याला मोठा भुर्दंड पडतो, म्हणून अगदी मध्यरात्रीसुद्धा कोणी नियम तोडत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com