श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर आजपासून नामयज्ञ सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

इंदोरी - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असा लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सोमवारपासून (ता. २२) अखंड नामयज्ञ प्रज्वलित होत आहे. 

इंदोरी - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असा लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सोमवारपासून (ता. २२) अखंड नामयज्ञ प्रज्वलित होत आहे. 

संत तुकाराम महाराजांना गुरू उपदेश मिळालेला दिवस म्हणून माघ शुद्ध दशमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भंडारा डोंगरावर अनेक वर्षांपासून हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. यंदाही श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचना केलेल्या परिसरातच त्यांच्या विचारांचे पारायण करण्याचा लाभ राज्यभरातून आलेले भाविक निसर्गरम्य परिसरात मनोभावे घेतात. आत्मानंदाची अनुभूती घेतात. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी, तर भंडारा डोंगरावर वारीच भरते. सर्व भागातील भाविक तुकोबारायांच्या चरणी लीन होतात. 

मावळ पंचक्रोशीतील भाविकांचा थेट सहभाग हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. यंदा २२ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या सप्ताहात दररोज सायंकाळी सात वाजता प्रामुख्याने राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. त्यात अनुक्रमे माउलीमहाराज कदम, ॲड. जयवंतमहाराज बोधले, आसाराममहाराज बढे, मदनमहाराज गोसावी, प्रमोदमहाराज जगताप, चैतन्यमहाराज देगलूरकर, उद्धवमहाराज मंडलिक यांची कीर्तने होतील. २९ जानेवारी रोजी विकासानंदमहाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. २२ ते २८ या कालावधीत दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत डॉ. विकासानंद मिसाळ हे सकल संत ज्ञानेश्‍वर महाराज कथा निरुपण करणार आहेत. सप्ताहाचा मुख्य दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी. २७ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पंडित कल्याण गायकवाड, युवा गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांचा स्वरानुभूती हा विशेष कार्यक्रम होणार आहे. पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले आहे.

Web Title: indori news namyagya sohala on bhandara dongar