इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्याला गळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

देहू - तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीतील पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीगळतीने स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्यासाठी पाणी समस्या निर्माण होते. देऊळवाडा ते इंद्रायणीच्या डोह परिसरातील माशांचे हाल होत आहेत. या बंधाऱ्याची दुरुस्तीची मागणी संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त, पंचायत समिती हवेली सदस्या हेमा काळोखे आणि ग्रामस्थांनी वारंवार केली आहे.

कै. वसंतदादा पाटील, कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कालावधीत सुमारे तीस वर्षांपूर्वी देहूतील इंद्रायणी नदीवर या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. या बंधाऱ्यामुळे खालुंब्रे आणि देहू गावातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला आहे. बंधाऱ्यामुळे देहू आणि परिसरातील गावांतील शेतकरी, नागरिकांना पाण्याची सोय झाली आहे.

देहू, विठ्ठलवाडी, येलवाडी, सुदुंबरे, खालुंब्रे, निघोजे गावातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होत आहे. मात्र, या बंधाऱ्याची सध्या दुरवस्था आहे. या बंधाऱ्याला भेगा पडलेल्या असून, पाण्याची गळती होत आहे. नदीतील पाण्याचा साठा कमी होत असून, शेतीला पाणी मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

बोडकेवाडी येथे देहूसाठी पाणीपुरवठा योजनेचे इंद्रायणी नदीवर जलउपसा केंद्र आहे. येथे पाणीसाठ्यासाठी बंधारा आहे. त्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जलउपसा केंद्राजवळ पाणीसाठा राहत नाही. एक वर्षापूर्वी पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनीही या भागाला भेट देऊन बंधाऱ्याचे काम त्वरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पाटबंधारे खात्याने बोडकेवाडीत दुरुस्तीचे काम केलेले नाही.

बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने सध्या या भागात पाणीसाठा मुबलक नाही. त्यामुळे विकास आराखड्याच्या संदर्भातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बंधारा दुरुस्तीबाबत पत्र दिले होते. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
- अशोक मोरे, विश्‍वस्त, संत तुकाराम संस्थान देहू

बंधारा दुरुस्तीचे अंदाजपत्रक पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठविलेले आहे. निधी उपलब्ध झाला की काम सुरू होईल.
-नारायण गदादे, शाखा अभियंता, मोशी पाटबंधारे विभाग

Web Title: indrayani river dam water leakage