इंद्रायणीनगर मंडई सुरू होण्याची आशा

Bhosari-Mandai-Condition
Bhosari-Mandai-Condition

भोसरी - इंद्रायणीनगरमधील भाजी मंडईतील गाळ्यांच्या लिलावासाठी शनिवारी (ता. १६) निविदा प्रसिद्ध होणार असल्याने भाजी मंडई लवकरच सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईत मद्यपान करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्यांवर आळा बसणार असून, मंडई तातडीने सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पालिकेने विकसित केलेली पेठ क्रमांक दोनमधील ही मंडई गेल्या अनेक दिवसांपासून धूळ खात पडून आहे. त्यामुळे अनेक टवाळखोरांनी तेथे अड्डा जमविला आहे. ते दिवसभर पत्ते खेळत बसल्याचे चित्र येथे पाहायला मिळते. मंडईच्या भिंती गुटख्याच्या पिचकारीने रंगलेल्या आहेत. मंडईचा ताबा न दिल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यालगत भाजी विक्री करावी लागत आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मंडई लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी सर्वांचीच मागणी आहे. 

भोसरीसह पेठ क्रमांक वीस चिखलीतील भाजी मंडई, वाकडमधील मंडईतील गाळ्याच्या लिलावाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत स्वीकृत सदस्य संजय वाबळे म्हणाले, ‘‘स्थानिक भाजी विक्रेत्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्थानिकांना स्थान न मिळाल्यास मंडई उभारण्याचा उद्देश फसेल. याविषयी आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्थानिक भाजी विक्रेत्यांना गाळे मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.’’ तर, नगरसेवक विलास मडिगेरी म्हणाले की, भाजी मंडईमध्ये इंद्रायणीनगर, भोसरी त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना स्थान मिळाले पाहिजे. यापूर्वीच ही मागणी केली आहे. 

ही भाजी मंडई सुरू होण्यापूर्वीच दुरवस्था झाली आहे. चोरट्यांनी भाजी मंडईतील नळ, गटाराच्या लोखंडी जाळ्या चोरून नेल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजी धुण्याच्या जागी लघुशंका केल्याने दुर्गंधी पसरली आहे. भाजी मंडई परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

इंद्रायणीनगर, चिखली व वाकडमधील भाजी मंडईतील गाळ्यांच्या लिलावाची निविदा शनिवारी (ता. १६) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गाळ्यांच्या लिलावानंतर स्वतः गाळेधारकाने गाळे भाड्याने दिल्यास त्यांच्या गाळ्याचा लिलाव रद्द ठरविण्यात येईल.  
- मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भूमी-जिंदगी विभाग

गाळ्यांसाठी भाडे
  इंद्रायणीनगर ---१७११ रुपये
  चिखली ---१८०० रुपये व  १७३५ रुपये
  वाकड ----  २२४० रुपये

गाळ्यांचे आरक्षण (टक्‍क्‍यांमध्ये)
  अंध अपंग-------- ३
  अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती भटक्‍या जमाती ---- ५
  महिला स्वयंसहायता गट----- ३०
  शेतकरी उत्पादक गट/शेतकी उत्पादक कंपनी ---- १०
  खुला संवर्ग ----- ५२

मंडईतील गाळ्यांची संख्या
  इंद्रायणीनगर  --- ७२ गाळे भाजीसाठी, १८ गाळे फळविक्रेत्यांसाठी
  चिखली ---१३९ गाळे  
  वाकड---- १८४ गाळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com