esakal | ऑक्सिजन पुरवठा थांबविल्याने उद्योग क्षेत्रही व्हेंटिलेटरवर
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

ऑक्सिजन पुरवठा थांबविल्याने उद्योग क्षेत्रही व्हेंटिलेटरवर

sakal_logo
By
- मंगेश कोळपकर

पुणे - ऑक्सिजनचा पुरवठा (OXygen Supply) राज्य सरकारने (State Government) गेल्या ४० दिवसांपासून थांबविल्यामुळे उद्योग क्षेत्र (Industrial Field) ठप्प होऊ लागले आहे. त्यामुळे निर्यातीवरही विपरीत परिणाम (Effect) झाला आहे. पुणे आणि परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सुमारे ५० टक्के उद्योग बंद पडू लागले आहेत. उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा तातडीने सुरू न झाल्यास हे क्षेत्र संकटाच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत. (Industrial Field Problem by Oxygen Supply Stop)

कोरोनाच्या रुग्णांसाठी राज्य सरकारने उद्योगांचा ऑक्सिजन ताब्यात घेतला; परंतु आता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनची मागणी घटली तरी उद्योगांना त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुरू असलेले उद्योग अडचणीत आले आहेत. प्लेट कटिंग, लेझर कटिंग, प्रोफाइल कटिंग, फॅब्रिकेशन, मटेरिअल हॅन्डलिंग, स्पेशल पर्पज मशिन आदींच्या कामांसाठी उद्योगांना रोज ऑक्सिजन लागतो. या मशिनसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असते. परंतु ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे उद्योगांचे कामकाज विस्कळीत होऊ लागले आहे. ऑक्सिजनला पर्याय म्हणून एअर कॉम्प्रेसरचा वापर काही ठिकाणी होऊ लागला तरी त्याला मर्यादा आहेत. परिणामी पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे.

हेही वाचा: Pune Corona: रुग्णसंख्येला उतरती कळा; पुणेकरांना दिलासा

निर्णय वरिष्ठ स्तरावर

याबाबत जिल्हा प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरू करणे आता गरजेचे आहे. कारण वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. परंतु, याबाबतचा निर्णय धोरणात्मक असल्यामुळे राज्य सरकारकडून याबाबत सूचना केव्हा मिळतील, याकडे आमचे लक्ष लागले आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे.’’

पन्नास टन तरी ऑक्सिजन द्या!

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ११ हजार अभियांत्रिकीशी संबंधित उद्योग आहेत. त्यातील किमान ५ हजार उद्योगांना ऑक्सिजन लागतो. त्यांना प्रती दिन किमान ५० टन तरी ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

काळ्याबाजाराला चालना

काही उद्योगांची उत्पादने अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यांना ऑक्सिजनची तातडीने निकड आहे; परंतु तो मिळत नसल्यामुळे काळ्या बाजारातून घ्यावा लागत आहे. एरवी २२५ ते २५० रुपयांना मिळणारा औद्योगिक वापराचा ऑक्सिजन सिलिंडर सध्या १२०० ते १५०० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे काळ्या बाजार करणाऱ्यांचे फावले असून, त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

प्रशासनात समन्वयाचा अभाव

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी होती तेव्हा रोज सुमारे ३८१ टन ऑक्सिजन लागत होता; परंतु रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ही मागणी कमी झाली आहे. सध्या २०० ते २३० टन ऑक्सिजन रोज पुण्यात लागतो. उर्वरित ऑक्सिजन शिल्लक राहतो. परिसरातील कंपन्यांतही आता ऑक्सिजन २५ ते ३० टक्के शिल्लक राहू लागला आहे. त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणे प्रशासनाला शक्य आहे. परंतु अधिकाऱ्यांमधील असलेला समन्वयाचा अभाव आणि तांत्रिक ज्ञानाची कमतरता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: सरकारी यंत्रणेला लागली ‘बुरशी’; इंजेक्शनसाठी प्रतीक्षा संपेना

पिंपरी-चिंचवडमध्ये

  • ११,००० - अभियांत्रिकीशी संबंधित उद्योग

  • ५,००० - उद्योगांना ऑक्सिजनची गरज

  • ५० टन - ऑक्सिजन दिवसाला देण्याची मागणी

उद्योगांना ऑक्सिजन गरजेचा आहे. वैद्यकीय मागणी आता कमी झाल्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्याचा आढावा घ्यावा आणि उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा. उद्योग अगोदरच संकटात आहेत आणि आता त्याची तीव्रता आणखी वाढत आहे.

- अशोक भगत, लघुउद्योजक

अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुतांश उद्योग ऑक्सिजनवर अवलंबून असतात. पुरवठादारांची साखळीही त्यावर अवलंबून असते. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे उत्पादन ते ग्राहक ही साखळी विस्कळीत झाली आहे. उद्योगांच्या ऑक्सिजनच्या गरजेची दखल कोणीतरी घ्यायला हवी. अन्यथा आमचे नुकसान वाढेल.

- भास्कर कुलकर्णी, लघुउद्योजक

ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अमेरिका, व्हिएतनाम येथे होणारी आमच्या उत्पादनांची निर्यात अडचणीत आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यास उत्पादन ठप्प होऊ शकते.

- अजय रामगोळ, पारी विप्रो, कॉर्पोरेट हेड

गेल्या ४० दिवसांपासून उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सुरू असलेल्या ५० टक्के उद्योगांना थेट फटका बसला आहे. वैद्यकीय कारण महत्त्वाचे असले, तरी उद्योगांना थोडा तरी ऑक्सिजनपुरवठा करावा.

- संदीप बेलसरे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

loading image