दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!

Rajesh_Baheti
Rajesh_Baheti

पुणे : कोरोनासारखी राष्ट्रीय आपत्ती आल्यावर, सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून एक उद्योगपती आणि त्याच्या कुटुंबियांनी सुमारे अडीच लाख फूड पॅकेटसचे वितरण केले. ससूनमधील डॉक्टर्स, पोलिस यांची काळजी घेतानाच निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या कुटुंबियांनाही पंधरा दिवसांचा शिधा पोचवून समाजाबद्दलची कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली.

राजेश बाहेती हे मूळचे पुण्याचेच. दुबईमध्ये त्यांचा गेल्या 38 वर्षांपासून हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी आणि त्यांच्या नातलगांनी सलग 27 मार्चपासून सलग 66 दिवस फूडकिट्सचे वितरण केले. विशेष म्हणजे या कामात आचारी आणि त्यांचे मदतनीस वगळता, पॅकिंग करण्याची सर्व जबाबदारी बाहेती कुटुंबियांनी उचलली. त्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते कार्यरत होते. महेश राठी, चेतन पटेल, गोपाळ मराठे, मनोज गांधी, अनिल होवाळे या मित्रांनीही त्यांना या उपक्रमात मदत केली.

सुमारे दीड कोटी रुपयांच्या खर्चातील प्रमुख वाटा हा बाहेती कुटुंबियांनी उचलला. या बद्दल राजेश बाहेती म्हणाले, "आम्ही फार काही वेगळे केलेले नाही. एका कठीण क्षणी, लोकांना मदत करण्याची भावना मनात आली आणि त्यानुसार आम्ही करीत गेलो. यासाठी परमेश्वराने आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो."

जिल्हा प्रशासनाने 'डिक्की'च्या समन्वयाने बाहेती कुटुंबियांकडे येरवडा आणि परिसरातील दहा शेल्टर्सची जबाबदारी दिली. त्यात सुमारे 850 लोक होते. त्यांना नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, ससूनमधील 60 डॉक्टर्स, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी यांना नियमितपणे फूडकिट्सचे वितरण होत होते. तर, कात्रज परिसरातील सुमारे 2 हजार श्रमिकांनाही आठ दिवस न्याहरी आणि फूडकिटसचे वितरण करण्यात आले. वेल्हा, मुळशीतील दुर्गम भागात आणि कोकणातील काही भागात 17 हजार कुटुंबांना प्रत्येकी 15 दिवसांचा जीवनावश्यक वस्तूंचाही साठा त्यांनी दिला. वाहतूक पोलिस शाखेतील सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख आणि महापालिकेतील अधिकारी माधव जगताप यांनी त्यासाठी बाहेती कुटुंबियांना समन्वयासाठी विशेष मदत केली.

परदेशातून वाढदिवसाची मदत 
बाहेती यांचे नातलग परदेशातही आहेत. इंग्लंडमधील त्यांच्या नातेवाईकांनी तंबोला गेम आयोजित केली होती. त्यातून जमा झालेले अडीच लाख रुपये त्यांनी या उपक्रमासाठी पाठविले, तर अमेरितील त्यांच्या नातलगांनी वाढदिवसानिमित्त एक वेळच्या किंवा एका दिवसाचा जेवणाचा खर्चही स्पॉन्सर केला होता. त्यामुळे फूड पॅकेटसच्या या उपक्रमाला 8 लोकांच्या वाढदिवसांचा हातभार लागला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com