बारामती एमआयडीसीतील उद्योगांबाबत महत्त्वाचा निर्णय

मिलिंद संगई
Saturday, 2 May 2020

ऑनलाइन परवानगी देण्यास सुरवात 

बारामती :  येथील एमआयडीसीतील उद्योगचक्र सुरू होण्यास प्रारंभ होणार आहे. बारामती एमआयडीसीतील उद्योगांना ऑनलाइन परवानगी देण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता बारामती एमआयडीसीतील काही उद्योग सुरू होण्याचा मार्ग रिकामा झाला आहे. काही नियम व अटींना अधीन राहून हे उद्योग सुरू करता येणार आहेत. 

आणखी वाचा- क्वारंटाइन की मरण टाइम ? विश्रांतवाडी केंद्रातील महिला करणार अन्नत्याग

बारामती एमआयडीसीतील उद्योग सुरू करताना प्रत्येक कंपनीतील 30 टक्केच मनुष्यबळ वापरायचे अशा अटीवरच व परवानगी घेऊन उद्योग सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत झालेल्या बैठकीत दिले. आज पवार यांनी बारामतीत येथील आढावा बैठक घेतली. त्यामध्ये एमआयडीसीतील उद्योग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

दरम्यान बारामतीतील उद्योजकांना त्यांच्या उद्योगामधील कर्मचाऱ्यांची नावे पोलिस स्टेशनमध्ये देऊन त्यांच्यासाठीचे पासेस घ्यावे लागणार आहेत. शासनाने काही नियम व अटी घालून दिलेल्या असून त्यानुसार हे उद्योग सुरू करता येणार आहेत. या निर्णयामुळे बारामती एमआयडीसीचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बारामतीत आज झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर, नगरसेवक किरण गुजर, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर अजित पवार यांनी रुई ग्रामीण रुग्णालय, मेडिकल कॉलेजला भेटी देऊन पाहणी केली. 
 

 

बारामती एमआयडीसीतील उद्योजकांनी परवानगीची प्रक्रिया सुरू केली असून तातडीने परवानगीही मिळत आहे. कर्मचाऱ्यांना पासेस मिळविण्यासाठी पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. 
- धनंजय जामदार, अध्यक्ष, इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन, बारामती. 

 

 

 

उद्योजकांच्या अडचणींचा विचार करून काही जाचक अटी शिथिल झाल्या असून प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामती एमआयडीसी आता सुरू होणार हे आता निश्‍चित झाले आहे. 
- प्रमोद काकडे, अध्यक्ष, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industry will start in Baramati MIDC