युती सरकारमुळे महागाई व आर्थिक मंदी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

राज्यात गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक मंदीत मोठी वाढ झाली आहे. यासाठी सध्याचे महायुतीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. सद्यःस्थितीत सरकार जनतेशी वागत असलेली पद्धतही चुकीची असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुणे - राज्यात गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक मंदीत मोठी वाढ झाली आहे. यासाठी सध्याचे महायुतीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. सद्यःस्थितीत सरकार जनतेशी वागत असलेली पद्धतही चुकीची असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिले जाणारे आदर्श जिल्हा परिषद, सरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार आज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्या वेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती प्रवीण माने, सुजाता पवार, राणी शेळके, सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महादेव घुले, संदीप कोहीनकर (ग्रामपंचायत) आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरविले जाते, हीच त्यांच्या कामाची पावती आहे. मात्र, त्यांनी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका आदींसह समाजातील अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांचे हे प्रश्‍न येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्गी लावले पाहिजेत. ग्रामसेवकांच्या संपामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू राहणार आहेत. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आताच टॅंकर व चारा छावण्यांबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आचारसंहितेकडे बोट करू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.''

या समारंभात दोन वर्षांचे आदर्श जिल्हा परिषद आणि प्रत्येकी तीन वर्षांचे आदर्श सरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आले. उदय जाधव यांनी प्रास्ताविक केले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. महादेव घुले यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inflation and economic downturn by Yuti Government Ajit Pawar